पुणे : प्रवाशांपेक्षा परिसरातील नागरिकांकडूनच स्वारगेट बसस्थानकातील सुविधांचा लाभ घेतला जात असल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच, या अनावश्यक गर्दीमुळे बसस्थानकाची सुरक्षितताही धोक्यात येत असल्याने रेल्वे स्थानकाप्रमाणेच स्वागरेट बसस्थानकावर प्लॅटफॉर्र्म तिकीट आकारण्यात यावे, यासाठी पुणे विभागाकडून परिवहन आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, त्याबाबत अद्याप कोणतेही उत्तर एसटीला देण्यात आले नसल्याने स्थानकाच्या सुरक्षा तसेच प्रवाशांच्या गैरसोयी दूर करण्याबाबत प्रशासनास मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन बसस्थानकाप्रमाणेच शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या स्वारगेट बसस्थानकावरून दरदिवशी जवळपास दोन हजार बसची ये-जा असते. त्यामुळे या स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची रेलचेल सुरू असते. त्यातच हे बसस्थानक जुने असल्याने त्या ठिकाणी असलेल्या प्रवाशांच्या सुविधा जेमतेम आहेत. या सुविधा या प्रवाशांना अपुऱ्या पडत असतानाच; गेल्या काही वर्षांत या स्थानकाच्या बाहेरील बाजूस मोठ्या प्रमाणात असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांमुळे अनेक जण या ठिकाणी आल्यानंतर स्वारगेट बसस्थानकाच्या आतील सुविधांचा लाभ घेतात. तर प्रवाशांना सोडण्याविण्यासाठी येणारे कुटुंबीय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे ग्रुप, दुपारच्या वेळेस विरंगुळ्यासाठी येणारे नागरिक आणि पथारी व्यावसायिक स्थानकात गर्दी करतात. या अनावश्यक गर्दीमुळे स्थानकाची सुरक्षितता तसेच एसटीच्या प्रवाशांची गैरसोय होते. (प्रतिनिधी)
स्वारगेटला प्लॅटफॉर्म तिकिटाचा प्रस्ताव
By admin | Published: January 21, 2016 1:26 AM