मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील टँकर मागणीचे प्रस्ताव ताबडतोब मंजूर केले जातील आणि पाणी व विकासाच्या बाबतीत राजकारण करू नका, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी वेल्हे येथे केले. पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती वेल्हे आणि कृषी विभाग यांच्या सयुक्त विद्यमाने वेल्हे पंचायत समिती सभागृहात खरीप हंगाम आढावा बैठक व पाणीटंचाई उपाययोजना सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यानवेळी देवकाते बोलत होते. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, कृषी व पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, कृषी विकास अधिकारी सुनील खैरनार, उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत भोर, तालुका कृषी अधिकारी विठ्ठल सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, दिनकर धरपाळे, सभापती सीमा राऊत, उपसभापती दिनकर सरपाले, पंचायत समिती सदस्य संगीता जेधे, माजी उपसभापती चंद्रकांत शेंडकर, माजी सभापती चतुरा नगिने, पंचायत समिती कृषी अधिकारी उत्तम साखरे आदींसह कर्मचारी शेतकरी उपस्थित होते.देवकाते म्हणाले, ‘‘वेल्हे तालुक्यातील टँकरचे प्रस्ताव ताबडतोब मंजूर केले जातील. यासाठी पंचायत समितीमध्ये टंचाई कक्ष स्वतंत्र तयार करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी गोकुळदास बैरागी यांना देण्यात आल्या आहेत. वेल्हे तालुक्यातून १० गावांनी टँकरची मागणी केली असल्याचे गटविकास अधिकारी गोकुळदास बैरागी यांनी या वेळी सांगितले. हे प्रस्ताव तहसीलदार कार्यालयाकडून ताबडतोब जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावेत. त्या ठिकाणी ते ताबडतोब मंजूर करण्याची जबाबदारी आमची राहील, असेही देवकाते यांनी या वेळी सांगितले.मागील वर्षी १९ मे रोजी टँकर सुरू करण्यात आला होता. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात तालुक्यातील गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. परंतु, या वेळी लवकरात लवकर टँकर सुरू करावेत, अशी मागणी सभापती सीमा राऊत यांनी केली. जिल्ह्यातून वेल्हे तालुक्यातून सर्वाधिक भाताचे बीज तयार होते. तालुक्यातील १८० शेतकऱ्यांनी २,००० क्विंटल बियाणे महाबीजला देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ प्रभारी जिल्हा व्यवस्थापक फाटे यांनी दिली. तर, तालुका कृषी अधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी खरेदी केल्याची पावती व बॅग जपून ठेवावी. जर बियाणे निकृष्ट लागले, तर कारवाई करणे सोपे जाईल, अशी माहीती दिली. जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी शिवकालीन टाकीसाठी वेल्ह्याला जास्तीत जास्त निधी मिळावा, अशी मागणी केली. त्यामुळे वेल्हे टँकरमुक्त होईल. कृषी अधिकारी उत्तम साखरे यांनी सूत्रसंचालन केले. तालुका कृषी अधिकारी विठ्ठल सोनावणे यांनी आभार मानले.(वार्ताहर)
टँकरचे प्रस्ताव ताबडतोब मंजूर केले जातील
By admin | Published: April 24, 2017 4:31 AM