पुणे : राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे साकारण्यात येत असलेल्या बाह्य रिंगरोडच्या पूर्व आणि पश्चिम भागातील काही ठिकाणी अतिरिक्त जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव महामंडळाने राज्य सरकारकडे सादर केला आहे. यात पश्चिम भागासाठी १० तर पूर्व भागातील २२ गावांमधील काही जमीन संपादित केली जाणार आहे. राज्य सरकारने प्रस्ताव मान्य केल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तसेच चांबळी व हिवरे गावांतील रिंगरोडची आखणी बदलल्याने या दोन गावांतही भूसंपादन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, पूर्व भागाच्या संपादनापैकी ३० हेक्टर जमीन येत्या पंधरवड्यात संपादित केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.
पुणे व पिंपरी परिसरातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी पुणे शहराला दोन रिंगरोड प्रस्तावित आहेत. बाह्य रिंगरोड राज्य रस्ते विकास महामंडळाकडून राबविण्यात येत आहे. रिंगरोडच्या पूर्व व पश्चिम भागांच्या रस्त्यासाठी महामंडळाने अतिरिक्त जमिनीची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. सेवा रस्ते, विविध सुविधांसाठीही अतिरिक्त जमिनीचे प्रस्ताव देण्यात आले आहे. यात पश्चिम भागासाठी चांदखेड, मुठे, कातवडी, खोपी, बहुली, रहाटवडे, उर्से, घोटावडे, परंदवडी, कासार आंबोली या १० गावांमध्ये संपादन केले जाणार आहे. तर पूर्व भागासाठी नानोली तर्फे आकुर्डी, लोणीकंद, बकोरी, बिवरी, कोरेगाव मूळ, पवारवाडी, गराडे, दिवे, चांबळी, वडगाव मावळ, सुदुंबरे, खालुंब्रे, हिवरे, कुरुळी, सोळू, निघोजे, धानोरे, सोनोरी, धापेवाडी, या गावांमध्ये संपादन केले जाणार आहे. तर चांबळी व हिवरे या दोन गावांत आराखडा बदलण्यात आल्याने येथेही आणखी संपादन केले जाणार आहे, अशी माहिती भूसंपादन समन्वयक डॉ. कल्याण पांढरे यांनी दिली.
दरम्यान, पश्चिम भागाचे संपादन पूर्ण होत आले आहे. येथील कामासाठी पाच कंपन्यांना कार्यादेश देण्यात आले आहेत. या कंपन्यांनी प्राथमिक कामाला सुरुवात केली असली तरी औपचारिक भूमिपूजनाला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. पूर्व भागाच्या २६५ हेक्टर भूसंपादनापैकी आतापर्यंत ३० हेक्टरचे संपादन शिल्लक आहे. यासंदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संपादनाचे निवाडे लवकर जाहीर करून संपादनाची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिल्याची माहिती हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने यांनी दिली. हे निवाडे २५ एप्रिलपर्यंत पूर्ण करून येत्या पंधरा दिवसांत संपादन पूर्ण करण्यात येईल, असेही माने यांनी यावेळी स्पष्ट केले.