पुणे : पुणे रेल्वे विभागाने मुंबई ते कोल्हापूर दरम्यान धावणारी सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वे प्रशासनाला पाठवला असल्याची माहिती पुणे विभागाचे रेल्वे अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली. सह्याद्री एक्स्प्रेस सुरू झाल्यास पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे.
सह्याद्री एक्स्प्रेस कोल्हापूरवरून रात्री १० वाजून ५० मिनिटांनी वाजता सुटायची आणि पुण्यात सकाळी ०६:५० पर्यंत येऊन मुंबईला (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ११:५० वाजेपर्यंत पोहोचत असे. तर मुंबईवरून (सीएसएमटी) सायंकाळी ०५:५० वाजता सुटून पुण्यात रात्री ०९:५५ वाजेपर्यंत पोहोचत असल्यामुळे दररोज कामानिमित्त पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही रेल्वे सोयीस्कर होती. पण, रेल्वे प्रशासनाने काही कारणास्तव ही सेवा मागच्या वर्षी बंद केली. सह्याद्री एक्स्प्रेस बंद झाल्यामुळे कोल्हापूरहून पुणे आणि मुंबईला दररोज कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना आणि पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली.
रेल्वे प्रशासनाने ही रेल्वे पुन्हा सुरू करावी अशी मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात होती. तसेच पुण्यातून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्यामुळे सध्या सुरू असलेल्या रेल्वेमध्ये बसण्याच्या जागेवरून मागच्या पंधरा दिवसांमध्ये पाच वेळा मारामारी झाल्याच्या घटना घडल्याचे उघड झाले आहे. नागरिकांच्या मागणीचा विचार करत, पुणे रेल्वे विभागाने मध्य रेल्वे प्रशासनाला सह्याद्री एक्स्प्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. मध्य रेल्वे प्रशासनाकडून हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठवला जाणार असून रेल्वे बोर्डाची मंजूरी मिळाल्यावर ही रेल्वे सेवा सुरू होणार आहे.सुपरफास्टचा दर्जा द्यावा..
सह्याद्री एक्स्प्रेसचे जुने कोच बदलून त्या रेल्वेला नवीन एलएचबी कोच लावून या रेल्वेला सुपरफास्ट रेल्वेचा दर्जा द्यावा. सह्याद्री एक्स्प्रेस सुरू झाल्यास कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील नागरिकांना याचा खूप फायदा होणार आहे.- हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना