लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “सर मला आवडणारी मुलगी बालाजीनगरला काल राहायला आली. मी तिला प्रपोज केले. परंतु तिने नकार दिला. आपण फक्त मित्र असल्याचे ती म्हणाली सांगितले. काहीतरी करा सर...,” असा प्रश्न एका तरुणाने थेट पोलीस आयुक्त अभितभ गुप्ता यांनाच विचारला.
“त्या मुलीची इच्छा नसेल तर तू काहीच करू नकोस. आम्हीही काही करु शकणार नाही. पण आमच्या शुभेच्छा नेहमीच तुझ्यासोबतच आहे,” असे मिश्किल उत्तर देत गुप्ता यांनी त्या तरुणाची समजूत काढली. बऱ्याच दिवसात भेट झाली नसल्याचे सांगत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सोमवारी (दि. ८) ट्विटरवरून पुणेकरांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पुणेकरांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यातच संबंधित तरुणाने स्वत:च्या नाकारल्या गेलेल्या ‘प्रपोजल’विषयी प्रश्न केला होता.
अन्य पुणेकरांनी वाहतूक, मास्क, पोलिसांची वागणूक, महिला सुरक्षा, नियम याबाबत गुप्ता यांच्याशी संवाद साधला. काही जणांनी खासगी आयुष्यातलेही प्रश्न त्यांना विचारले. गुप्ता यांनी जास्तीत जास्त पुणेकरांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.
चौकट
मास्कबाबत अनेक प्रश्न
आम्ही मास्क घालू का, ‘चारचाकी’मध्ये अनिवार्य आहे का, अजून किती दिवस मास्क घालावे लागेल, असे प्रश्न पुणेकरांनी विचारले. यावर गुप्ता म्हणाले, “सद्यस्थितीत नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहणे फारच महत्वाचे आहे. मास्क घातल्याने तुम्ही कोरोना आजारापासून दूर राहू शकता. दंड आकारण्यापेक्षा तुमची आरोग्य आणि सुरक्षा माझ्या दृष्टीने महत्वाची आहे. तरुण हे भारताचे भविष्य आहेत. त्यांनी तर मास्क घालणे अनिवार्य आहे. तरुणांकडून नियमांचे पालन होत नसेल. तर ती अत्यंत निराशाजनक बाब आहे.”
चौकट
हेल्मेट आणि तरुणांमधली गुन्हेगारी
हेल्मेट घालणे योग्य आहे का या प्रश्नावर पोलिस आयुक्त गुप्ता म्हणाले की, हेल्मेटची निवड सुरक्षेसाठी करा. हा आवडीचा मुद्दा नाही. शाळा, महाविद्यालयीन तरुणांमध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारीबद्दल गुप्ता म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये गुन्हेगारी वाढण्यास सोशल मीडिया आणि आजूबाजूचे वातावरणच जबाबदार आहे. आई-वडिलांनी यात लक्ष देणे गरजेचे आहे.” स्त्रियांच्या सुरक्षेसाठी पोलीस नेहमीच सतर्क राहणार आहेत. रात्री-अपरात्री कधीही मदत लागल्यास पोलीसांचे प्राधान्य पहिल्यांदा स्त्रियांच्या सुरक्षेला राहिल. त्यांनी अजिबात घाबरू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.