महाराष्ट्रात स्वतंत्र गिर्यारोहण इन्स्टिट्यूटचा प्रस्ताव; अमोल कोल्हेंच्या प्रयत्नांना सरकारचा प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 08:10 PM2023-06-20T20:10:45+5:302023-06-20T20:11:14+5:30
देशातील पाचवी गिर्यारोहण इन्स्टिट्यूट महाराष्ट्रात उभी राहण्याच्या आशा पल्लवित
नारायणगाव : राज्यात स्वतंत्र गिर्यारोहण इन्स्टिट्यूटची निर्मिती करण्याच्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असून क्रीडा विद्यापीठ अंतर्गत या संस्थेच्या निर्मितीसाठीचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे देशातील पाचवी गिर्यारोहण इन्स्टिट्यूट महाराष्ट्रात उभी राहण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, गिर्यारोहणासाठी जुन्नरसह राज्यात विविध ठिकाणी अनेक आव्हानात्मक पर्वतरांगा आहेत. या पर्वतरांगांवर चढाई करण्यासाठी अनेक तरुण - तरुणी येतात. अनेकजण एव्हरेस्टसह हिमालयातील विविध शिखरांवर चढाईसाठी जातात. या सगळ्यांना मार्गदर्शन, शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्यासाठी उत्तरकाशी येथे नेहरु इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनियरींग, दार्जिलिंग येथे पर्वतारोहण संस्था (HIM), मनाली येथे अटलबिहारी वाजपेयी माऊंटेनियरींग अॅण्ड अलाईड स्पोर्ट्स आणि पहलगाम येथील जवाहर इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनियरींग (JIM) अशा चार संस्था आहेत. परंतु महाराष्ट्रासारख्या गिर्यारोहणाची मोठी परंपरा असणाऱ्या राज्यात एकही संस्था नाही. त्यामुळे अशा प्रकारची स्वतंत्र गिर्यारोहण इन्स्टिट्यूट राज्यात व्हावी यासाठी माझा प्रयत्न आहे.
मागणीला सकारात्मक प्रतिसाद
विशेष म्हणजे या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ अंतर्गत गिर्यारोहक इन्स्टिट्यूटची निर्मिती करण्याच्या दृष्टीने याबाबतचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी खासदार डॉ. कोल्हे यांना पत्राद्वारे कळवले आहे. त्यामुळे भविष्यात राज्यात स्वतंत्र गिर्यारोहण इन्स्टिट्यूट स्थापन होण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल पडले आहे. राज्यातील गिर्यारोहणासाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे असे म्हणता येईल.