विवेक भुसे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अमेरिकेतील मियामी येथे अंडर ट्रायल कैद्यांसाठी बहुमजली कारागृह उभारण्यात आले आहे. त्याच धर्तीवर मुंबईत बहुमजली कारागृह उभारण्याचा प्रस्ताव कारागृह विभागाने गृह विभागाकडे दिला असल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक आणि कारागृह महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी दिली.
सध्या देशभरात ही काही कारागृहे उभारण्यात आली आहेत. ती बरक पद्धतीने उभारण्यात आली आहेत. त्याला कोठेही मजले नाही. मुंबईत जागेची टंचाई असून शहराचा विस्तार व लोकसंख्या वाढत असताना तेथील गुन्हेगारीमध्येही वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक कारागृहांच्या क्षमतेपेक्षा अधिक कैदी ठेवावे लागत आहेत. सध्यस्थिती त्यातून कारागृहात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेऊन मुंबईसारख्या शहरात मियामीप्रमाणे बहुमजली कारागृहाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
याबाबत कारागृह महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी सांगितले की, मियामीप्रमाणे मुंबईत बहुमजली कारागृह उभारण्याचा प्रस्ताव गृह विभागाला सादर करण्यात आला आहे. चेंबूर येथील टाटा इन्स्टिट्यूटसमोरील जागेमध्ये अशा प्रकारे बहुमजली कारागृह उभारता येईल. या ठिकाणी ५ हजार कच्च्या कैद्यांना ठेवता येईल. खालच्या मजल्यावर कारागृह अधिकारी, कर्मचारी यांच्या राहण्याची सोय असेल. वरच्या मजल्यांवर कैद्यांना ठेवता येईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.
कारागृहातील ६९ टक्के कैद्यांचे लसीकरण
राज्यातील विविध कारागृहांमध्ये सध्या ३३ हजार ७१९ शिक्षा झालेले तसेच कच्चे कैदी आहेत. त्यापैकी आतापर्यंत २३ हजार २७७ कैद्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. अनेक कारागृहांत ९० टक्क्यांपर्यंत लसीकरण करण्यात आले आहे. काही मध्यवर्ती कारागृहांमध्ये कैद्यांची संख्या अधिक असल्याने तेथील लसीकरण संख्यात्मकदृष्ट्या अधिक झाले असले तरी एकूण टक्केवारीनुसार कमी झाले आहे.