पुणे : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करत चार पीडित तरुणींची सुटका केली. त्यामध्ये पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातील तरुणींचा सहभाग आहे. वाघोली येथील उबाळेनगरमधील जय भवानी लॉजिंग ॲण्ड बोर्डिंग येथे हा प्रकार सुरू होता.
याप्रकरणी, लोणीकंद पोलिस ठाण्यात लिंबाजी सखाराम वाघमारे (वय २९), प्रवीण शेखर पुजारी (रा. आळंदी फाटा लोणीकंद) या दोघांच्या विरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील लिंबाजी वाघमारे याला अटकदेखील करण्यात आली आहे.
सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला वाघोली येथील उबाळेनगरमधील जय भवानी लॉज ॲण्ड बोर्डिंग येथे वेश्याव्यवासाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर छापा टाकून चार तरुणींनींची तेथून सुटका केली. ताब्यात घेतलेल्या चार तरुणींची हडपसर येथील रेस्क्यू फाउंडेशनमध्ये रवानगी करण्यात आली आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी राजेंद्र कुमावत, मनीषा पुकाळे, तुषार भिवरकर, इरफान पठाण, अमित जमदाडे यांच्या पथकाने केली.