बारामती: बारामती एमआयडीसीपाठोपाठ शहरातील भरवस्तीत सुरु असलेला वेश्या व्यवसाय बारामती तालुका पोलीसांनी उघड केला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलीस कर्मचारी नंदू जाधव यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.त्यानुसार याप्रकरणी प्रतिक सुरेश ठोंबरे (रा. सूर्यनगरी, बारामती) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या एका महिलेची पोलिसांनी सुटका केली.
भिगवण रस्त्यावर एका सदनिकेत सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर रविवारी( दि. २८) फेब्रुवारी रोजी ही कारवाई करण्यात आली. तालुका पोलिसांना ठोंबरे हा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी पैशाचे अमिष दाखवत काही महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली. त्यांच्या आदेशानंतर छापा टाकण्यात आला. त्यासाठी बनावट ग्राहक तयार करून त्याच्याकडे एक हजार रुपयांची रक्कम देण्यात आली. ठोंबरे याच्या राहत्या घरी छापा टाकण्यात आला. यावेळी महिला पोलिसांनी येथे उपस्थित असलेल्या महिलेला तिचे नाव विचारले. प्रतिक ठोंबरे याने पैशाचे आमिष दाखवत वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे तिने सांगितले. या २८ वर्षीय महिलेची पोलिसांनी सुटका केली. घटनास्थळावरून पोलिसांनी मोबाईल व अन्य साहित्य असा ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.