पुणे : आईच्या आत्महत्येनंतर सतत तीन वर्ष वडीलांकडून बलात्कारासारखे अत्याचार सहन केल्यानंतर मावशीने सांभाळ करण्यासाठी घरी नेलेल्या 16 वर्षीय मुलीला काकानेच वेश्याव्यवसायाला जुंपल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी छापा टाकून सुटका केल्यानंतर पिडीत मुलीने दिलेल्या जबाबामधून ही बाब समोर आली. काकाला येरवडा पोलिसांनी अटक केली असून वडीलांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी आई-वडीलांसह ताडीवाला रस्ता परीसरामध्ये राहण्यास होती. वडीलांकडून होत असलेल्या त्रासामुळे या मुलीच्या आईने सप्टेंबर 2010 मध्ये आत्महत्या केली. त्यानंतर वडीलांना अटक झाली. अवघ्या दहाव्या वर्षी आईच्या मायेला पोरकी झालेली ही मुलगी वडीलांच्या कारागृहात जाण्यामुळे एकटी पडली होती. तीन वर्षांनंतर तिच्या वडीलांची जामिनावर मुक्तता झाली. त्यानंतर त्यांनी दुस-या महिलेशी लग्न केले. 2013 मध्ये कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने पोटच्या मुलीवरच लैंगिक अत्याचार करायला सुरुवात केली. सलग तीन वर्ष तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरु होते. अत्याचारांना विरोध केला की तिला जीवे ठार मारायची धमकी मिळायची. यामधून एकदा ही मुलगी गरोदर राहीली. त्यावेळी सावत्र आईने पिडीत मुलीलाच धमकी देऊन गप्प केले. तिला गरोदर न राहण्याच्या गोळ्या देऊ लागली. तिचा नीट सांभाळही ते करीत नव्हते. तिला वेळेवर जेवायलाही मिळत नसे. वडीलांकडून होणा-या मारहाण आणि छळाला कंटाळलेली ही मुलगी आत्याकडे मन मोकळं करायची.
आत्याला तिची दया आली. तिने या मुलीला घरी नेले. वर्षभर ही मुलगी त्यांच्याकडे येरवड्यातील एका सोसायटीमध्ये राहात होती. आत्याचे पती टेम्पो चालक असून त्यांना आठ वर्षांची एक मुलगी व चार वर्षांचा एक मुलगा आहे. टेम्पो चालवून चरितार्थ चालविणे अवघड जात असून खर्च दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र या मुलीसमोर उभे करण्यात आले. त्याने घरातील अडचणी सांगत तिला भावनिक करायला सुरुवात केली. देहविक्रय केल्यास चांगले पैसे मिळतील आणि गरीबी दूर होईल असे तो सांगू लागला. तिला देहविक्रयासाठी तयार केल्यानंतर त्याने ग्राहक शोधायला सुरुवात केली. दरम्यान, त्याने आणखी एका सज्ञात मुलीचाही सौदा ठरवला होता. अवघ्या 16 वर्षांच्या मुलीचा त्याने एक लाख रुपयांमध्ये सौदा ठरवला होता. दरम्यान, सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील यांना पोलीस नाईक प्रदीप शेलार यांच्याकडून या सर्व प्रकाराबाबत माहिती मिळाली. वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील, सहायक निरीक्षक शितल भालेकर यांच्या पथकाने बनावट ग्राहकामार्फत आरोपीशी संपर्क साधला. ठरलेल्या ठिकाणावर छापा टाकून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत दोघींची सुटका केली. या मुलींची रवानगी सुधारगृहामध्ये करण्यात आली असून आरोपी काकाविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मुलीला सुधारगृहामध्ये पाठविण्यात आल्यानंतर जबाब नोंदवित असताना वडीलांकडून होत असलेल्या अत्याचाराला वाचा फुटली. दरम्यान, या मुलीने शाळेमधील वर्ग शिक्षिका यांना याची कल्पना दिली होती. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिकांनाही याबाबत माहिती देण्यात आली होती. त्यावेळी दोघींनीही तिच्या आत्याला बोलावून याबाबत विचारणा केली होती. त्याचवेळी याबाबत कारवाई झाली असती तर कदाचित पिडीत मुलीवर वेश्याव्यवसायाला जुंपले जाण्याची वेळ आली नसती.