पुणे : धानोरी परिसरातील महादेवनगर परिसरात पैशांचे आमिष दाखवून मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणारे रॅकेट पोलिसांच्या छाप्यात उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी वेश्याव्यवसायातून तीन महिलांची सुटका केल्याची माहिती दिली.
याप्रकरणी महिला पोलिस हवालदार मनीषा पुकाळे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रंजना सिंगदेवी (३५, रा. धानोरी, पुणे, मूळ राहणार आसाम) या महिलेला अटक करण्यात आली आहे. धानोरीतील गुडविल स्क्वेअर येथील प्रीमियम युनिक सलूनमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकास मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी खातरजमा करून संबंधित पाच सेंटरवर छापे टाकले.
त्यावेळी पीडित तीन महिलांची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आली आहे. संबंधित महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त केले होते. या प्रकरणाचा तपास विश्रांतवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ढवळे करत आहेत.