पुणे : मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्पा चालक व मॅनेजर दोघांना अटक करून चार पीडित परदेशी मुलींची सुटका करण्यात आली. सामाजिक सुरक्षा विभागास कोरेगाव पार्क येथील मसाज स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसायाकरिता मुली ठेवून त्यांना पुरुष गिऱ्हाईकांना मसाजच्या नावाखाली पुरवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याबाबत माहिती मिळाली होती.
त्यानुसार स्पा सेंटरमध्ये बनावट ग्राहक पाठवून खात्री करून छापा टाकून स्पा चालविणाऱ्या दोन पुरुष आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील चार परदेशी महिलांची सुटका करण्यात आली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ते मसाज सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता मसाज करणाऱ्या महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेत होते.
कारवाईवेळी एकूण २८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सहा आरोपींविरूद्ध कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६चे कलम ३, ४, ५ सह भारतीय दंडविधान कलम ३७०, ३४ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला. ही कामगिरी सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके, मनिषा पुकाळे, राजेंद्र कुमावत, अजय राणे, प्रमोद मोहिते, अमित जमदाडे व पुष्पेंद्र चव्हाण या पथकाने केली.