पुणे: कपाशीच्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव होत असून त्यापासून वेळीच काळजी घ्या, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
मावा व तुडतुडे अशी दोन प्रकारची किड कपाशीला जुलैच्या पहिल्या व शेवटच्या आठवड्यात सुरुवात होते. यासाठी रोपाची दररोज पाहणी करावी. दहापेक्षा जास्त पानांवर कीड आढळली की, नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकाचा वापर करावा. आंतर मशागत करून पीक तणरहित ठेवावे. त्यामुळे किडींच्या पर्यायी खाद्य तणांचा नाश होईल. अतिरिक्त नत्र खताचा वापर टाळावा यामुळे किडीचे प्रमाण कमी होईल.
बीटी कापसाच्या बियाणांवर किडनाशाची प्रक्रिया आधीच केलेली असते. त्यामुळे रसशोषक किडींपासून २ ते ३ आठवड्यांपर्यंत बियाणाला संरक्षण मिळते. म्हणून या काळात किटकनाशकांची फवारणी करू नये, असे कृषी विभागाने म्हटले आहे. किडीवर ऊपजिविका करणारे नैसर्गिक किटक आहेत. त्यातून किड नियंत्रणात राहते, किटकनाशक फवारले तर हे किटक नष्ट होतात, त्यामुळे गरज नसताना फवारणी करू नये. त्याऐवजी किडींच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.