पुणे : कोरेगाव भिमा प्रकरणी भाजपाने स्वयंघोषित सत्यशोधन समिती तयार केली असून ती समिती मुख्य आरोपीवरुन लक्ष विचलीत करुन दिशाभूल करण्याचे काम करत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे यांना वाचविण्यासाठी ही सत्यशोधन समिती तयार केल्याचेही पत्रात म्हंटले आहे. भाजपाचे माजी खासदार प्रदीप रावत यांनी गुुरुवारी पत्रकार परिषद घेत सत्यशोधन समितीचा अहवाल सादर केला होता. त्यात हा माओवादी विचारांच्या संघटना,खोटा इतिहास पसरवून जातीय तेढ निर्माण करणाºया फुटीरतावादी गट याचा पूर्वनियोजित कट होता,यात आंबेडकरी व हिंदुत्ववादी गटाचा यामध्ये काहीही संबंध नाही असा निष्कर्ष मांडण्यात आला होता. त्याचबरोबर पोलीसांनी जर योग्य पाऊले उचलली असती तर ही दंगल रोखता आली असती असेही त्यांनी म्हंटले होते. त्यावर ही समिती संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना वाचविण्यासाठी भाजपाने स्थापन केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. मिलिंद एकबोटेंना सुप्रीम कोर्टाने जामीन नाकारला तरी पोलीस त्यांना अटक करण्यास टाळाटाळ करत होते. मनोहर भिडेंना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री त्यांना निर्दोष असल्याचे सिद्ध करत आहेत. याचा अर्थ हा सरकार पुरस्कृत दहशतवाद आहे हे सर्व सत्य असताना भाजपाची स्वयंघोषित सत्यशोधन समिती भिडे, एकबोटेंचे नाव न घेता एल्गाप्र परिषद, संभाजी ब्रिगेड व परिवर्तनवादी संघटनांवर आरोप करुन संभ्रम निर्माण करीत आहे. असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर एल्गार परिषदेत झालेली भाषणांचे व्हीडीओ उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी प्रक्षोभक वक्तव्य कोणीही केलेले नाही. सरकारवर टीका म्हणजे प्रक्षोभक होत नाही. त्यामुळे परिवर्तनवादी संघटनांवर जे आरोप समिती करीत आहे ते बिनबुडाचे असल्याचेही या पत्रकात म्हंटले आहे. मुख्यमंत्र्यांनी न्यायालयीन समिती स्थापन केल्याचे सांगितले. मात्र ही समिती कोरेगाव भिमाला गेलेली नाही त्यामुळे सरकार या प्रकरणात टाळाटाळ करुन दिशाभूल करत आहे. तरी सर्व प्रथम मनोहर भिडे यांना अटक करुन या प्रकारणाचा सखोल तपास करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड करुन करण्यात आली आहे.
मुख्य आरोपींना वाचविण्यासाठीच भाजपाने स्वयंघोषित समिती स्थापन केली : संभाजी ब्रिगेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 9:22 PM