पुणे: विशाळगडावर आणि सह्याद्रीमध्ये आढळून येणारी अतिशय सुंदर अशा कंदीलपुष्प या वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध लागला असून, त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे. या प्रजातीचे नामकरण 'सेरोपेजिया शिवरायीयाना', असे केले आहे. ही वनस्पती वेलवर्गीय आहे, तर त्याचे चार वेल संशोधकांना विशालगडावर दिसून आले.
आपल्या महाराष्ट्रामध्ये कंदीलपुष्पाच्या २६ प्रजाती पहायला मिळतात. त्यातील १७ प्रजाती या प्रदेशनिष्ठ आहेत. महाराष्ट्रामध्ये ‘सेरोपेजिया’ या वनस्पतीच्या प्रदेशनिष्ठच्या प्रजाती सर्वाधिक आहेत. यामधील बहुतेक जाती दुर्मीळ आहेत. आता विकासकामांमुळे काही प्रजाती धोक्यात येत आहेत.
'इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर'ने (आययूसीएन) कंदीलपुष्पाच्या काही प्रजातींना 'संकटग्रस्त' म्हणून रेड लिस्टमध्ये समाविष्ट केले आहे. ही परिस्थिती असताना वनस्पती संशोधकांना विशाळगडावर कंदीलपुष्पची नवी प्रजाती आढळून आली आहे. या वनस्पतीचा शोध वनस्पतिशास्त्रज्ञ अक्षय जंगम, डाॅ. शरद कांबळे, डाॅ. श्रीरंग यादव, रतन मोरे, डाॅ. निलेश पवार यांनी लावला आहे. याविषयीचे संशोधन मंगळवारी (दि.६) 'फायटोटॅक्सा' या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले.
गेल्या काही वर्षांपासून अक्षय जंगम आणि डॉ. नीलेश पवार कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ल्यावरील वनस्पतींचा अभ्यास करताहेत. त्याअंतर्गत त्यांना ऑगस्ट २०२३ मध्ये विशाळगडावर कंदीलपुष्प वर्गातील एक वेगळी वनस्पती दिसली. त्यांना ही प्रजाती 'सेरोपेजिया सांतापावी' आणि 'सेरोपेजिया करुळेएन्सिस' या दोन प्रजातींशी साधर्म्य असणारी वाटली. या प्रजातीची तुलना 'सेरोपेजिया लावी' या प्रजातीशी केली. 'सेरोपेजिया लावी' ही झुडूपवर्गीय वनस्पती असून 'सेरोपेजिया शिवरायीयाना' ही वेलवर्गीय आहे. ही प्रजाती केवळ विशाळगडावरच दिसली आहे. नव्या प्रजातीला महाराजांचे नाव का दिले, तर शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ याच सह्याद्रीमध्ये रोवली. गडकिल्ल्यांच्या माध्यमातून शिवरायांनी या वनस्पतींना संरक्षणच दिले होते. गडांची राखण करावी, निसर्ग जपावा अशीच भावना शिवरायांची होती. त्यामुळे त्यांची निसर्ग संवर्धनाची भावना लक्षात घेऊन या वनस्पतीला त्यांचे नाव दिले.