पुणे : वन्यजीवांच्या संरक्षणाचा विचार करताना विकासाला प्राधान्य द्यायचे की वन्यजीवांसाठी संरक्षित क्षेत्र तयार करायचे, हा आपल्यासमोरील गहन प्रश्न असल्याचे मत माधव गोगटे यांनी व्यक्त केले. निसर्गसेवक संस्थेचा निसर्गसेवक पुरस्कार यंदा नागेश दप्तरदार यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. रमेश गोडबोले, कार्यवाह मेधा जोशी, सहकार्यवाह मनमोहन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या अभयारण्य या विषयावरील विशेषंकाचे प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संस्था करत असलेल्या कार्याबद्दल संस्थेचे अभिनंदन करत माधव गोगटे म्हणाले, निसर्गसेवक संस्था करत असलेल्या कामाची समाजाला गरज आहे. बहुतेक किनार पट्टींचा विकास करण्यात येत असल्याने वन्यजीवांसाठी मोठ्या प्रमाणावर संरक्षित क्षेत्र निर्माण करणे अवघड झाले आहे. त्यामुळे छोटी संरक्षित क्षेत्र निर्माण करणे आवश्यक आहे. कोकण किनारपट्टीवर मासेमाऱ्यांच्या जाळ्यांमध्ये अडकून अनेक कासवांना आपले प्राण गमवावे लागत होते. नागेश दप्तरदार व स्थानिक कार्यकर्त्यांनी या जखमी कासवांचे जीव वाचवून, कासवांना कशा पद्धतीने हानी होणार नाही, या बाबतचे मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेची पारितोषिके वितरीत करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजीव पंडित यांनी केले.
वन्यजीवांसाठी संरक्षित क्षेत्रे अवघड
By admin | Published: April 02, 2017 3:01 AM