पिंपरी : निवडणुकीची धामधूम सुरू असताना शहरामध्ये मोटारींच्या काचांना काळ्या फिल्म लावण्याचे व अशा मोटारी रस्त्यावरून फिरण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. कामाच्या ओढाताणीत पोलिसांकडून याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने निवडणुकीच्या काळात काळ्या काचांच्या पडद्याआड सुरक्षा व्यवस्था झाकोळली जात असल्याचे दिसून येत आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून बेकायदा कृत्यांना आळा घालण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. त्याला चांगले यशही मिळत आहे. शहरातील पोलिसांनी वेगवेगळ्या घटनात मागील दहा दिवसांत २ जणांकडून शस्त्र जप्त केली आहेत. गुन्हेगारांकडे केलेल्या तपासानुसार पुणे पोलिसांनी नुकताच मध्यप्रदेशमध्ये छापा टाकून शस्त्रनिर्मितीच्या कारखान्याचा पर्दाफाश करून २४ अग्निशस्त्रे हस्तगत केली आहेत. नाकाबंदीदरम्यान दोन ठिकाणी बेहिशेबी पैसा वाहतूक उघड झाली आहे. निवडणूक अखेरच्या टप्प्यावर असून, पैशाची अवैध वाहतूक व शस्त्रांचा पुरवठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहनामध्ये कोण बसले आहे, त्यांच्या हालचाली संशयास्पद तर नाहीत ना, या बाबींचा उलगडा होण्यास मोटारींच्या काचांना पारदर्शक फिल्म असणे गरजेचे आहे. मात्र शहरात विविध ठिकाणी मोटारींच्या काचांना गडद काळ्या रंगाच्या फिल्म बसवण्याचा धंदा उघडपणे सुरू आहे. तसेच अशा मोटारी रस्त्यावरून बेबंद धावत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने मोटारींच्या काचांना फिल्म बसविताना किमान ७० टक्के दृष्यता (पारदर्शकता) असणे बंधनकारक आहे. मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष करून तब्बल १५ टक्के (जवळजवळ अपारदर्शक) अशा गर्द काळ्या फिल्म बसविल्या जात आहेत. अशा गडद काळ्या फिल्म बसविलेल्या मोटारीतून फिरणारे अनेकजण आहेत. मात्र त्यांची ओळख पटविणे गस्तीवरील पोलिसांना तत्काळ शक्य होत नसल्याने बहुधा अशी मंडळीतील काही गैरमार्गाने काही वाहतूक करीत असली, तरी ते निसटून जाण्याचीच जास्त शक्यता आहे. साधारणत: ३५ टक्के, ५० टक्के दृष्यता असणाऱ्या फिल्म लावण्याचे प्रमाण अधिक आहे. या देशी बनावटीच्या फिल्म बसविण्यासाठी ६०० रुपये दर असून १ वर्षाची हमी दिली जाते. आयात केलेल्या दर्जेदार फिल्म बसविण्यास ७०० ते १००० रुपये घेतले जातात. त्यासाठी ४ वर्षांची हमी व्यावसायिक देत आहेत. अशाप्रकारे काळ्या फिल्म लावण्याच्या व अशा मोटारी वापरण्यामुळे गैरप्रकार वाढण्याच्या धोक्यासह सुरक्षेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)
काळ्या काचांमागे झाकोळली सुरक्षा
By admin | Published: October 09, 2014 5:27 AM