पुणे : राज्यातील स्स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण संतुलनासाठी व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियान हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातही या अभियानाला सुरुवात झाली आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्त्वांच्या आधारे हे अभियान राबविले जाणार आहे. या अभियानात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेस १३ नगरपरिषदा आणि २६ मोठ्या गावांचा समावेश आहे. वरील पंचतत्त्वांनुसार पर्यावरण रक्षणाच्या हेतूने कामे केली जाणार आहे. या अभियानाचे मूल्यमापन होणार असून यासाठी विविध वर्गवारीत १५०० गुण आहेत
जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतींचा झपाट्याने विस्तार होत आहे. या गावांतील पर्यावरणाचा समतोल साधावा, या हेतूने हे अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनापासून हे अभियान सुरू झाले आहे. ज्या गावांची लोकसंख्या ही १० हजारांच्या वर आहे अशा गावांची निवड केली जाणार आहे. जिल्हा परिषदेने या साठी ३४ गावे निवडली होती. मात्र, यातील काही गावे ही पुणे आणि पिंपरी पालिकेत गेली आहे. त्यामुळे ही गावे वगळून २६ गावे या अभियानासाठी निवडली आहेत.पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश ही पंचतत्त्वे अभियानासाठी आधारभूत ठेवण्यात आली आहे.
पृथ्वी पंचतत्त्वांनुसार : गावातील सामाजिक वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन आणि जमिनीचे धुपीकरण ही कामे केली जाणार आहेत. आतापर्यंत ५२ हजार ५८४ झाडे लावण्यात आली आहेत. यात ५० टक्के झाडे ही देशी आहेत. वायू पंचतत्त्वानुसार हवेच्या गुणवत्तेसाठी वायुप्रदूषण कमी केले जाणार आहे. आतापर्यंत वायु परिक्षण झाले नसले तरी झाडे लावण्यात आली आहे.
जल पंचतत्त्वानुसार : नदीसंवर्धन, जैवविविधता जतन करणे, जलस्रोतांचे संरक्षण व संवर्धन करणे आणि नदीकिनाऱ्याची स्वच्छता केली जाणार आहे. या विभागात ओढा खोलीकरणाची कामे झाली आहेत. तर रेनवाॉटर हार्वेस्टिंगचे ३८ कामे झाली आहेत. नद्यांच्या स्वच्च्छतेसाठी ही कामे हाती घेण्यात आली आहे.
अग्नी तत्त्वांनुसार : ऊर्जेचा परिणामकारक वापर करणे, त्याचा अपव्यय टाळून, त्यात बचत करणे, अपारंपरिक ऊर्जेच्या निर्मितीसाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूने रिकाम्या असलेल्या जागा, पडीक जमिनी आणि शेताचे बांध यासारख्या जागांवर पारंपरिक ऊर्जेबाबतचे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहे. या तत्वानुसार आतापर्यंत सौर उर्जेवरील ४ हजार ४७३ एलईडी, १८० बायोगॅस प्रकल्प तर ५८ सौर पंप लावण्यात आहे. यात आणखी वाढ होणार आहे.
आकाश तत्त्वानुसार : स्थळ आणि प्रकाश या स्वरूपात मानवी स्वभावातील बदलांसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी जनजागृती आणि शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे प्रसार व प्रचार केला जाणार आहे. यासाठी फ्लेक्स, बॅनर हे निवडण्यात आलेल्या गावांत लावले जात आहे.
......................
गावांचा होणार गौरवराज्यात या अभियानाअंतर्गत पंचतत्वानुसार चांगली कामे करणाऱ्या गावांचा, नगरपरिषदांचा व पालिकांचा गौरव केला जाणार आहे. १५०० गुणांचे हे अभियान असणार आहे. पृथ्वी ६०० गुण, वायू १०० गुण, जल ४०० गुण, अग्नी १०० गुण, आकाश ३०० गुण, एकूण १५०० गुण असे मिळून १५०० गुण या अभियानासाठी आहेत. पुणे आणि पिंपरी शहरांचा समावेश असून त्यांना अमृत शहरे ही नाव देण्यात आले आहे.
..............
जिल्ह्यातील स्पर्धेसाठी निवडलेली गावेनिमगाव केतकी, बावडा, आंबेगाव खुर्द, कडुस, वारूळवाडी, वरवंड, आळे, इंदुरी, कळंब, पाटस, माळेगाव बुद्रूक, कदमवाकवस्ती, नारायणगाव, लोणी काळभोर, शिक्रापूर, बारामती ग्रामीण, ओतूर, उरुळीकांचन, तळेगाव ढमढेरे, राहू, बोरीपार्धी, रांजणगाव गणपती, यवत.
..............या अभियानाची जिल्ह्यात तयारी सुरू झाली आहे. त्यानुसार निवडण्यात आलेल्या गावांत कामे सुरू आहेत. ही सर्व गावे त्यांची उद्दीष्ट पूर्ण करणार आहेत.-आयुष प्रसाद, मुख्य कायर्यकारी अधिकारी