पुणे : माओवाद्यांशी संबंध असल्याचे सांगत देशभरात विचारवंतांना आणि मानवधिकार कार्यकर्त्यांच्या अटक सत्रांचा निषेध करत पुरोगामी संघटनांनी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. हिटलरशाही नहीं चलेंगी अशा घोषणा यावेळी यावेळी देण्यात आल्या.
यावेळी प्रा. अंजली आंबेडकर, विद्या बाळ, किरण मोघे, सुभाष वारे, साधना ददीच, किशोर ढमाले, सुनील सुखतनकर, नितीश नवसागरे तसेच अनेक पुरोगामी कार्यकर्ते उपस्तिथ होते. पुणेपोलिसांनी केलेल्या कारवाईवर टीका यावेळी करण्यात आली, तसेच पुणे पोलिसांना लिहिण्यात आलेल्या एक विशेष अवमानपत्राचे जाहीर वाचन करण्यात आले. 'उठा ठोकशाहीच्या विरोधात', 'मी टू अर्बन नक्षल', 'हिटलरशाही नहीं चली, मोदीशाही भी नही चलेंगी' अशा घोषणा लिहिलेले फलक हातात धरण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा देण्यात अाले. विचारवंतांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजप अध्यक्ष अमित शहा यांना ठार मारण्याचा हास्यास्पद आरोप ठेवून तथाकथित पत्रांच्या आधारावर त्यांच्याविरुद्ध कट रचल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच देशातील दलित, आदिवासी, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या आणि सरकारच्या जनविरोधी धोरणांबद्दल आवाज उठवणारी हे सर्वजण असल्याने त्यांचा आवाज आणि विचार दडपण्यासाठी सरकारने अटकेची कारवाई केली अाहे. सनातनवरील बंदीच्या मागणीवरून लक्ष हटवण्यासाठी हे अटकसत्र सुरू असल्याचा पुर्नउच्चार यावेळी करण्यात अाला.