पुणे : जवाहरलाल नेहरु आंतरराष्ट्रीय विद्यापीठातील(जेएनयु) विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी विविध सामाजिक संघटना एकत्र आल्या आहेत. पुण्यात आज विविध ठिकाणी या हल्ल्याचा निषेध करण्यात येणार आहे. संध्याकाळी 4 वाजता जिल्हाधिकार्यालयासमाेर आंदाेलन करण्यात येणार असून रात्री सात वाजता डेक्कन येथील गुडलक चाैकातही आंदाेलन करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात फुले- शाहू आंबेडकर विद्यार्थी कृती समितीच्या वतीने निषेध सभा बाेलविण्यात आली आहे.
रविवारी दिल्लीतील जेएनयुमधील विद्यार्थ्यांवर ताेंडाला कापड बांधून आलेल्या गुंडांनी हल्ला केला. यात 15 ते 17 विद्यार्थी गंभीर जखमी झाले. या घटनेचे आता देशभरात विविध ठिकाणी पडसाद उमटत आहेत. रविवारी रात्री पुण्यातील फिल्म इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांनी या घटनेचा निषेध नाेंदवला. इन्स्टिट्युटच्या मुख्य प्रवेशद्वारासमाेर विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. मुंबईतही रविवारी रात्री गेट वे ऑफ इंडिया येथे एकत्र येत तरुणांनी निदर्शने केली. आज सकाळी पुण्यातील गरवारे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देखील हल्ल्याचा निषेध केला.
आज संध्याकाळी 4 वाजता विविध सामाजिक संघटा एकत्र येत आंदाेलन करणार आहेत. त्याचबराेबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात देखील संध्याकाळी 6 वाजता निषेध सभेचे आयाेजन करण्यात आले आहे. त्याचबराेबर डेक्कन येथील गुडलक चाैकात देखील नागरिक एकत्र येत निदर्शने करणार आहेत.