लोकमान्य टिळक राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सन्मानित केले जाणार आहे. येथील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक ज. टिळक, ट्रस्टचे विश्वस्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, रिपब्लिकन व डाव्या तसेच आंबेडकरवादी, पुरोगामी पक्ष संघटना यांच्या वतीने त्यांचा निषेध करण्यात येत आहे. सकाळी ९ वाजल्यापासून मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळा येथे नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवून नरेंद्र मोदी चले जावच्या घोषणा दिल्या.
बाजीराव रस्त्यावर देखील आंदोलन करण्याची तयारी विरधकांनी केली होती. पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. आमदार रविंद्र धंगेकर, मोहन जोशी, रमेश बागवे इत्यादी नेते आंदोलन करत होते. त्यावेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांसोबत असलेल्या कार्यकर्त्यांनादेखील ताब्यात घेतलं आहे.
पुण्यातील अनेक रस्ते असतील बंद
अलका चौक, स्वारगेट, फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रोड, पुणे विद्यापीठ चौक, टिळक रोड, शिवाजी चौक, कुमठेकर रोड, लक्ष्मी रोड, सिमला ऑफीस चौक, संचेती चौक, संगमवाडी रोड, गोल्फ कल्ब चौक, विमानतळ रोड, स गो बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक आणि सेवासदन चौक हे प्रमुख मार्ग दुपारी ३ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. पुणे वाहतूक पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे.
'मेट्रो १'च्या दोन मार्गिकांचे लोकार्पण-
'मेट्रो १च्या फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय आणि गरवारे स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या दोन मार्गिकांचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. २०१६ मध्ये मोदींच्याच हस्ते पायाभरणी झाली होती.
'पीएम आवास' तील घरांचे लोकार्पण होणार-
पुणे महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत वडगाव खुर्द, हडपसर, खराडी येथे बांधलेल्या २६५८ घरांचे लोकार्पण होणार आहे. योजनेंतर्गत पिंपरी चिंचवड पालिकेने बांधलेल्या १ हजार २८० हून अधिक घरांचे लोकार्पण होईल. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या ६ हजार ४०० घरांचे भूमिपूजन होणार आहे.