पुणे : सांस्कृतिक शहर अशी ओळख असणाºया पुणे शहरातील तरूणाई सनबर्न फेस्टिव्हलमुळे नशेच्या विळख्यात सापडण्याची भीती आहे. त्यामुळे लवळे येथे सनबर्न फेस्टिव्हलला परवानगी देऊ नये, या मागणीसाठी सनबर्नविरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तसेच पालकमंत्री गिरीश बापट व सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची भेट घेऊन सनबर्नला परवानगी देऊ नये अशी मागणी केली.शहरात गणेशोत्सव, दहीहंडी सारख्या उत्सवांना रात्री दहानंतर ध्वनिप्रदूषण होऊ नये यासाठी ध्वनिक्षेपांना बंदी घातली जाते.तसेच डेसिबलची मर्यादा ठेवली जाते. मात्र, सनबर्नसारख्या फेस्टिव्हलला परवानगी देताना शासनाच्या कोणत्याही अटी शर्थी लागू केल्या जात नाहीत. त्यामुळे पुणे शहर दहीहंडी व गणेशोत्सव समन्वय समितीचा सनबर्नला विरोध असून सनबर्नविरोधी कृती समितीने शुक्रवारी धरणे आंदोलन केले. तसेच अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांना सनबर्नला परवानगी नाकारावी, याबाबतचे निवेदन दिले. सनबर्नच्या आयोजकांनी न्यायालयातून परवानगी आणली आहे. त्यामुळे राज्य शासन व जिल्हा प्रशासनाला यात हस्तक्षेप करता येत नाही, असे बापट यांनी आंदोलकांशी चर्चा करताना स्पष्ट केले.
सनबर्न फेस्टिव्हलविरोधात आंदोलन, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 1:56 AM