निगडी: सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा रुपीनगर तळवडेच्या वतीने जालना येथे झालेल्या मराठा आंदोलकांवरील पोलिसी बळाच्या वापराच्या निषेधार्थ, निषेध आंदोलनाचे आयोजन रुपीनगर येथील घारजाई माता मंदिराच्या समोरील चौकात करण्यात आले. रुपीनगर- तळवडे परिसरा मधील सर्वपक्षीय नेते, सर्व सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते तसेच सर्व जातीपंथातील कार्यकर्ते या निषेध आंदोलनात सहभागी झालेले होते.
पोलीस प्रशासनाने केलेल्या बळाचा निषेध तसेच या सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी रुपीनगर परिसरामध्ये अबालवृद्ध एकत्र आले होते . मराठा समाजाने ५८मोर्चे शांततामय मार्गाने काढले, ४८ मराठा बांधवांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही.
आरक्षणासाठी सर्व निकष पूर्ण करत असून देखील न्यायालयामध्ये हे आरक्षण अडकले आहे. या आरक्षणासाठी सरकारची इच्छाशक्ती हवी आहे असे सांगून जालन्यामध्ये झालेल्या मारहाणीमध्ये ज्या माता भगिनींचे व कार्यकर्त्यांचे रक्त सांडले त्या रक्ताचा हिशेब व जाब शासनाला आम्ही विचारल्याशिवाय राहणार नाही. जालन्यातील जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत समाजाच्या सर्व न्याय्य व हक्काच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर यापुढे अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी सकल मराठा समाजा रुपीनगर तळवडे यांच्या वतीने देण्यात आला.