जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांना निवेदन : गिरीश बापट, मुरलीधर मोहोळ यांच्याशी चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : डॉक्टरांवरील हिंसाचारविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेतर्फे शुक्रवारी (१८ जून) निषेध दिन पाळण्यात आला. खासदार गिरीश बापट यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. संसदेत रखडलेला कायदा लवकरात लवकर मंजूर व्हावा, यासाठी पुढाकार घेण्याचेही आश्वासन दिले. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी डॉक्टरांशी ऑनलाईन संवाद साधला. त्याचप्रमाणे आयएमएतर्फे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मागण्यांचे निवेदन दिले.
डॉक्टर कोरोनाच्या काळात प्राणपणाने रुग्णसेवा करत असताना डॉक्टरांवर हल्ला होण्याच्या अर्क घटना गेल्या दीड वर्षांमध्ये घडल्या आहेत. डॉक्टरांवरील हिंसाचाराविरोधात केंद्रीय कायदा व्हावा, हल्ल्याशी संबंधित खटले जलदगती न्यायालयात चालावेत, अशा विविध मागण्यांसाठी शुक्रवारी देशभरात डॉक्टरांनी निषेध दिन पाळला. काळ्या फिती, काळे मास्क लावून डॉक्टरांनी दिवसभर काम केले. हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाच्या १०० रुग्णालयांमध्ये शांततेत आंदोलन करण्यात आले.
रुग्णालयांवरील हल्ले रोखण्यासाठी भारतात २३ राज्यांमध्ये कायदा अस्तित्वात आहे. महाराष्ट्रात कायदा २०१० पासून अस्तित्वात आहे. परंतु, गेल्या ११ वर्षांत या कायद्याअंतर्गत आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. सर्व प्रकारच्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी, समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी निषेध दिन पाळण्यात आला. विविध क्षेत्रांतील व्यक्ती आणि संस्थांनी आपल्या फेसबुक, ट्विटरवर #savethesaviours हा ट्रेंड करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
-----
खासदार गिरीश बापट यांची आयएमए सदस्यांशी चर्चा
खासदार या नात्याने संसदेत डॉक्टरांवरील हिंसाचाराविरोधातील कायद्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन गिरीश बापट यांनी दिले. आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी, आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची गरज, त्यासाठी आवश्यक असणारी तरतूद अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कायद्यातील बदलांबाबत चर्चा झाली. या वेळी आयएमए पुणेचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब देशमुख, डॉ. संजय इंगळे, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
-------
गेले दीड वर्ष आपण सर्वजण कोरोनाच्या महामारीशी लढा देत आहोत. डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी देवदूत होऊन रुग्णांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. ते आहेत म्हणून आपले प्राण वाचले. असे असतानाही डॉक्टरांवर होणारे हल्ले, रुग्णालयात केली जाणारी तोडफोड अशा घटना अत्यंत दुःखदायक आणि क्लेशकारक असतात. माझे सर्व नागरिकांना आवाहन आहे की, अशा घटना घडणार नाहीत, याची काळजी आपल्यातील प्रत्येकाने घ्यायला हवी आणि डॉक्टरांना सहकार्य करायला हवे. आयएमएच्या जनजागृती अभियानाला माझा पूर्ण पाठिंबा आहे.
- मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे