मराठा मोर्चा आंदोलकांचे शरद पवार यांच्या घरासमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 04:13 PM2018-08-09T16:13:08+5:302018-08-09T16:59:09+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या माळेगांव येथील ‘गोविंदबाग’या निवासस्थानासमोर रस्त्यावर ३ तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.
बारामती : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (दि. ९)क्रांतीदिनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या माळेगांव येथील ‘गोविंदबाग’या निवासस्थानासमोर रस्त्यावर ३ तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने बारामती- निरा रस्ता रोखण्यात आला. यावेळी आंदोलकांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. यावेळी माजी उपमुख्यमंंत्री अजित पवार यांनी ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. तसेच मराठा क्रांती मोर्चासमवेत घोषणा दिल्या.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २ आॅगस्टपासून बारामती नगरपरिषदच्या शेजारी ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले होते. या आंदोलनाची बुधवारी (दि. ८) यशस्वी सांगता करण्यात आली. सुमारे ६ दिवस झालेल्या येथील ठिय्या आंदोलनात तालुक्यातील विविध गावांमधील मराठा बांधवांनी मार्ग निहाय सहभाग घेतला. त्यापाठोपाठ क्रांतीदिनी माजी केंद्रीय मंत्री पवार यांच्या निवासस्थानासमोरील रस्त्यावर समाज बांधवांनी ठिय्या दिला. सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करता येतो, तर मग मराठा आरक्षणाबाबत तो न्याय का दिला जात नाही. असा प्रश्न मराठा बांधवांना पडला आहे. ही मागणी प्रखरपणे लोकप्रतिनिधींमार्फत शासनाकडे पोहचविण्यासाठी क्रांतीदिनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या गोविंदबाग (निरा रस्ता) येथील घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे मोर्चाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. त्याप्रमाणे हे आंदोलन करण्यात आले.
सकाळी ९ वाजताच मराठा बांधव पवार यांच्या घरासमोर जमले. त्यानंतर बारामती- निरा मार्गावर मराठा बांधवांनी ठिय्या दिल्याने वाहतूक ठप्प झाली. एक तासानंतर अजित पवार ठिय्या आंदोलनाला सामोरे गेले. यावेळी पवार यांनी देखील मराठा क्रांती मोर्चा समवेत सुमारे अर्धा तास ठिय्या दिला. तसेच, पवार यांनी यावेळी युवकांच्या आग्रहास्तव उभा राहून घोषणा दिल्या. असे कसे देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, एक मराठा लाख मराठा या घोषणा पवार यांनी यावेळी दिल्या.
त्यानंतर पवार यांना यावेळी महिला, युवतींच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी एक मराठा लाख मराठा, जय भवानी जय शिवाजी, कोण म्हणत देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, जय जय जय जिजाऊ, आले रे आले मावळे आले, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, रक्ता रक्तात भिणलंय काय, जय जिजाऊ जय शिवराय, तुमचे आमचे नाते काय... जय जिजाऊ जय शिवराय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, राजमाता जिजाऊ की जय आदी घोषणांनी परिसर दुमदुमला.
ठिय्या आंदोलनादरम्यान पुर्ण शांतता पाळण्यात येईल, कोणाचेही भाषण होणार नाही. केवळ विद्यार्थीच प्रसिध्दी माध्यमांशी बोलतील, संबंधितांना निवेदन केवळ महिला, महाविद्यालयीन युवतींमार्फत देण्यात येईल, अशी आचारसंहिता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घालून देण्यात आली होती. दुपारी १२ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरु होते.