पुणे: एमपीएससीने नवीन पॅटर्ननुसार वर्णनात्मक पध्दत २०२५ पासून लागू करावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी साेमवारी सुरू केलेले आंदाेलन सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरूच हाेते. मुख्यमंत्र्यांसाेबत बैठकीचे आश्वासन आणि सलग दाेन रात्री रस्त्यावर जागून काढल्यामुळे बुधवारी दुपारी आंदाेलकांची संख्या ओसरली हाेती. मात्र, सायंकाळी त्यामध्ये पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले. दरम्यान, उपाेषणामुळे एका आंदाेलकाची तब्येत खालावल्यामुळे बुधवारी दुपारी त्याला हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
आंदाेलनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आंदाेलनस्थळी भेट दिली आणि आंदाेलक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हा प्रश्न सुटू शकताे असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना देत मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांसाेबत बैठक घेऊ आणि चर्चा करू असे आश्वासन दिले. मात्र, त्यानंतरही आंदाेलन सुरूच ठेवत जाेपर्यंत एमपीएससी नाेटिफिकेशन काढत नाही ताेपर्यंत उपाेषणावर ठाम असल्याचे आंदाेलक विद्यार्थ्यांनी सांगितले.
आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अक्षय जैन यांना हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मागणी मान्य हाेईपर्यंत आम्ही आंदाेलनस्थळ साेडणार नसल्याचा विद्यार्थ्यांचा निर्धार कायम आहे. दरम्यान, उपाेषणासाठी बसलेल्या आंदाेलक विद्यार्थ्यांची पथकाकडून वैद्यकीय तपासणी केली जात आहे. दिवसभर कमी झालेली विद्यार्थी संख्या सायंकाळनंतर हळूहळू वाढू लागली. तसेच आंदाेलनस्थळी घाेषणाबाजी, मनाेगत, कविता आणि गीत गायनाच्या माध्यमातून वातावरण पुन्हा तापू लागले.