पुणे : वर्णनात्मक परीक्षा पद्धत २०२५ पासून लागू करावी याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला. मात्र, अद्याप महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे साेमवारी २० राेजी एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले. झाशीची राणी लक्ष्मीबाई चाैकात एकत्र जमून त्यांनी धरणे आंदाेलन केले. जाे पर्यंत एमपीएससी वर्णनात्मक परीक्षेबाबत निर्णय घेणार नाही ताेपर्यंत आमरण उपाेषणाला सुरुवात केली आहे.
आंदाेलक विद्यार्थी राणी लक्ष्मीबाई चाैकात जात असताना पाेलिसांनी विद्यार्थ्यांना अडविले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बालगंधर्व रंग मंदिराबाहेर रस्त्याच्याकडेला ठिय्या दिला. यावेळी ‘मागणी मान्य केली,निर्णय झाला,अंमलबजावणी कधी करणार?’, ‘वर्णनात्मक पेपर करू नका,आमची स्वप्ने ताेडू नका’,‘मुख्य परीक्षेचा पॅटर्न २०२५ पासून लागू करा’ या आशयाचे फलक हातात घेतले हाेते.
वर्णनात्मक परीक्षा या वर्षापासूनच लागू करण्याच्या निर्णयाविराेधात तसेच समर्थनार्थ ही पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदाेलने केली. टिळक चाैकात ३१ जानेवारी राेजी झालेल्या आंदाेलनानंतर कॅबिनेट बैठकीत राज्यसेवा मुख्य परीक्षेचा बदललेला पॅटर्न २०२५ पासून लागू करावा असा निर्णय घेतला. याबाबत मुख्यमंत्र्यांनी आयाेगाच्या अध्यक्षांना पत्र लिहून विनंतीही केली. मात्र,तीन आठवड्यांचा कालावधी झाला असून एमपीएससीने निर्णय घेतला नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
निर्णय घेत नाहीत ताेपर्यंत उपाेषण
विद्यार्थ्यांनी अनेकवेळा आंदाेलने करूनही निर्णय घेतला नाही. त्यामुळे जाे पर्यंत एमपीएससी वर्णनात्मक परीक्षा २०२५ पासून घेण्याचा निर्णय घेणार नाही ताेपर्यंत बेमुदत आमरण उपाेषण करणार असल्याचे आंदाेलकांनी सांगितले.