पुणे महापालिकेचा निषेध; काँग्रेस भरवणार रस्त्यावरच शाळा
By राजू इनामदार | Published: January 1, 2024 06:28 PM2024-01-01T18:28:57+5:302024-01-01T18:30:36+5:30
महात्मा फुले यांच्या समता भूमी वाड्यासमोर ३ जानेवारीला काँग्रेसच्या वतीने रस्त्यावरच प्रतिकात्मक शाळा भरवली जाणार
पुणे: शहरातील शिक्षण संस्थांच्या शाळा व महाविद्यालयांना त्यांचा मिळकत कर थकला म्हणून नोटीस बजावण्याच्या तसेच शाळांना सील लावण्याच्या कृतीचा काँग्रेसने निषेध केला आहे. महापालिकेच्या विरोधात यासाठी महात्मा फुले यांच्या समता भूमी वाड्यासमोर ३ जानेवारीला काँग्रेसच्या वतीने रस्त्यावरच प्रतिकात्मक शाळा भरवली जाणार आहे.
प्रदेश चिटणीस संजय बालगुडे तसेच शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र व्यवहारे यांनी ही माहिती दिली. महापालिकेच्या वतीने सध्या थकीत कर वसुली मोहिम सुरू आहे. त्याअंतर्गत शहरातील मान्यवर शिक्षण संस्थांच्या शाळा व महाविद्यालयांच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. काही शाळांना तर थेट सील लावण्यात आले. बालगुडे यांनी सांगितले की ज्या शहरात महात्मा फुले यांनी आधुनिक शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली, त्यात शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थेने अशा प्रकारचे काम करावे हे आश्चर्यचकित करणारे आहे. याचा कोणी विरोधही करायला तयार नाही.
महापालिकेडून कर आकारणीत भेदभाव केला जात असल्याचा आरोप बालगुडे व व्यवहारे यांनी केला. शहरात अनेक मंगल कार्यालये, लॉन्स आहेत. त्यांचे मालक राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातील बड्या असामी आहेत. त्यांना कमी दराने कर आकारणी केली जाते. त्यांना थकलेल्या कराचे हप्ते करून दिले जातात. त्यांच्यावरील कारवाई टाळली जाते, शिक्षण संस्थांवर मात्र त्वरीत कारवाई केली जात आहे. मुळातच शाळा किंवा महाविद्यालयांना अशा प्रकारे जास्त दराने कर आकारणी करणे अन्यायाचे आहे. त्यातही कर थकले असतील तर त्यांना हप्ते बांधून देणे गरजेचे आहे. मात्र तसे न करता थेट कारवाई केली जात आहे.
याचाच निषेध म्हणून काँग्रेस ३ जानेवारीला आद्य महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. काँग्रेस यादिवशी फुले यांच्या समता भूमी या राष्ट्रीय स्मारकासमोर रस्त्यावर शाळा भरवून महापालिकेचा निषेध करणार आहे असे बालगुडे म्हणाले. महापालिकेने त्वरीत आपल्या धोरणात बदल करावा, थकबाकीच्या शिक्षण संस्थांना बजावलेल्या नोटिसा मागे घ्याव्यात व त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना थकीत रकमेचे हप्ते बांधून द्यावेत अशी मागणी त्यांनी केली.