पुणे : महाराष्ट्रातल्या मेळघाटमधल्या मुलाने थेट कारगिल गाठले आहे. अर्थात ते कारगिल पर्यटनासाठी नाही तर थेट कारगिलचा जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाला आहे.
अर्थात 27 वर्षांच्या संतोष सुखदेवेने कारगिलबद्दल वाचले ते बातम्यांमधूनच. कारगिलचे युद्ध झालं तेव्हा संतोष अवघ्या सहा वर्षांचा होता. मेळघाटातल्या मधलं 600 ते 700 लोकवस्तीचे धारणी जवळचं नारवाटी हे संतोषचे गाव. हातातोंडाशी गाठ असलेल्या आई-वडिलांना आणि गावातल्या लोकांना छोट्या छोट्या कामांसाठी सरकारी अधिकाऱ्यांकडे खेटे घालताना संतोष लहानपणापासूनच पहात होता. अर्थात आपल्या आयुष्याचं ध्येय होईल हा विचार मात्र त्यानी बारावी झाली तरी केला नव्हता.
गावात विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे पहिली ते चौथी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा... अभ्यासात हुशार असलेल्या संतोषला पुढच्या शिक्षणासाठी जवळच्या गावात ॲडमिशन मिळाली. त्याची हुशारी पाहून शाळेतल्या एका शिक्षकांनी त्याला नवोदय विद्यालयात प्रवेश घ्यायचं सुचवलं. अमरावतीच्या नवोदय विद्यालयात प्रवेश झाला आणि हा संतोषच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला.
बारावीपर्यंत नवोदयमध्ये शिक्षण घेतल्यानंतर संतोषनी इंजिनीयरिंग करायचं ठरवले. त्यासाठी त्याला पुण्याचा सीओईपीमध्ये ऍडमिशन देखील मिळाली. अर्थात पहिली अडचण पुण्यात दाखल झाल्यावर आली ती राहायची. कॉलेज चा वसतिगृहात प्रवेश ना मिळाल्याने कुठे राहायचं हा पहिलाच प्रश्न होता. गोखलेनगरचा विद्यार्थी सहाय्यक समितीने हा प्रश्न सोडवला. राहायची सोय झाल्यावर त्याने स्कॉलरशिप आणि कमवा शिका मधून शिक्षणाचा खर्च भागवायला सुरुवात केली. पण शिकतोय ते पुरेसं नाही असं त्याला सतत वाटत होतं.
पण मग करायचं काय हे ही कळत नव्हतं. लोकमत शी बोलताना संतोष म्हणाला ," वेगवेगळ्या माध्यमातून मी लोकांना मदत करायचो आणि ते मला आवडत होतं त्याचं समाधान मिळत होतं. गावी लोकांचे होणारे हाल ही पाहिले होते. त्यातून ठरवलं की आपण ज्यातून बदल घडवता येईल अस काही करू. समोर दोन पर्याय होते एक म्हणजे एनजीओ मध्ये काम करणे आणि दुसरा म्हणजे सरकारी नोकरी करणे. मी अर्थातच दुसरा पर्याय निवडला."
इंजिनिअरिंगचा शेवटचा वर्षाला असताना संतोष नी यूपीएससीची तयारी सुरू केली. सिव्हिल इंजिनिअरिंग संपताना संतोष ला बार्टी मधून दिल्लीला यू पी एस सी ची तयारी करण्यासाठी जाण्याची संधी मिळाली. जवळपास दीड वर्ष तयारी झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा परीक्षा दिली आणि त्यातच तो पास ही झाला.निकाल लागल्यावर संतोष नी आई वडिलांना निकाल कळवायला फोन केला "आई म्हणाली चांगलं झालं तुला सरकारी नोकरी लागली. तिला आय ए एस होणं म्हणजे काय हे माहीत नव्हतं. मग मी तिला सांगितलं की मी नेमका काय काम करणार आहे " संतोष म्हणाला.
त्यानंतर ट्रेनिंग पूर्ण झालं आणि मग त्याला कॅडर मिळाले ते जम्मू काश्मीर. " काश्मीर ची आई वडीलांची इमेज होती ती बातम्या मधून पाहिलेली. ते घाबरले. पण मी ट्रेनिंग मध्ये त्यांना इथे काय वातावरण आहे ते पहिल्याच सांगितलं. "
अर्थात सांगितलं तितकं हे सोपं नव्हतं असं संतोष च म्हणणं आहे. आधी एस डी एम म्हणून काम केल्यावर त्याला जिल्हाधिकारी म्हणून पोस्टिंग मिळालं ते थेट कारगील चं. संतोष चा मते ज्या खुर्चीवर बसायचं स्वप्नं होतं ते पूर्ण झाले पण तर आव्हाने ही घेऊन आले आहे. तो म्हणतो " कारगिल हे माहीत असलेलं ठिकाण असलं तरी विकासाचा बाबतीत ते अगदी मागे आहे. इथे शिक्षणाचे प्रमाण अगदी कमी आहे. त्याचाच परिणाम म्हणजे बेरोजगारी च प्रमाण जास्त. पर्यटक इथे येतात ते ही धावती भेट द्यायला. या सगळ्याच बाबतीत काम करायची गरज आहे.सरकारी योजना राबवून हा विकास करायचा आहे. मेळघाट चा अडचणी अनुभवल्या आहेत.त्यामुळे जमिनीशी नाळ जोडलेली आहे. इथून पुढेही तेच करायचं आहे.