पिंपरी : चव्हाण रुग्णालयाच्या परिचारिका मीनाक्षी वाघमोरे (वय २६) यांचा कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला. घरी जात असताना एका पेटलेल्या अवस्थेतील महिलेस त्वरित उपचार मिळवून देण्यात स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला. याबाबतची घटना अशी - ड्युटी संपवून वाघमोरे दुपारी पावणेचारला वाल्हेकरवाडी येथील घरी चालल्या होत्या. चिंचवड स्टेशन येथील एका शाळेमागून त्यांना धूर येत असलेला दिसला. जवळ गेल्या असता त्यांना झोपडीबाहेर एक २७ वर्षांची महिला आगीत पेटलेल्या अवस्थेत दिसली. तिची पाच वर्षांची मुलगी व दीड वर्षाचे बाळ रडत असल्याचे दिसले. मदत करण्याचे सोडून केवळ बघ्याची भूमिका घेत आजूबाजूला लोक उभे होते. वाघमोरे यांनी धावत जाऊन त्या महिलेच्या अंगावर पाणी टाकून आग विझविली. तिच्या अंगावर आपली ओढणी टाकली. रुग्णालय व पोलिसांना फोन करून बोलावून घेतले. जखमीस वायसीएम रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी तिला पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात नेले. जखमी महिलेची जबाबदारी तेथील सामाजिक कार्यकर्तीकडून देऊन त्या रात्री साडेदहाला घरी निघाल्या. कोणतीही ओळख नसताना केवळ माणुसकीच्या नात्याने त्यांनी ही सेवा बजावली. ही घटना ५ मे रोजी घडली. (प्रतिनिधी)
माणुसकी दाखविणार्या नर्सचा गौरव
By admin | Published: May 13, 2014 2:29 AM