अभिमानास्पद! पुण्याच्या डॉ. नीला केदार गोखले होणार उच्च न्यायालयात न्यायाधीश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 10:50 AM2023-01-12T10:50:51+5:302023-01-12T10:51:07+5:30

सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयांसमोर दिवाणी, फौजदारी आणि घटनात्मक स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये गोखले यांचा सक्रिय भाग

Proud! Pune's Dr. Neela Kedar Gokhale will be a judge in the High Court | अभिमानास्पद! पुण्याच्या डॉ. नीला केदार गोखले होणार उच्च न्यायालयात न्यायाधीश

अभिमानास्पद! पुण्याच्या डॉ. नीला केदार गोखले होणार उच्च न्यायालयात न्यायाधीश

googlenewsNext

पुणे : नवी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या व मूळच्या पुणेकर असलेल्या डॉ. नीला केदार गोखले यांना मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी बढती देण्यात येणार आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने शिफारस केली आहे. पुण्यात विधी महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केलेल्या गोखले यांची न्यायाधीशपदी नियुक्ती होत आहे, पुणेकरांसाठी ही नक्कीच अभिमानाची बाब ठरली आहे.

नीला गोखले यांचे प्राथमिक शिक्षण पाषण येथील सेंट जोसेफ हायस्कूल येथे झाले असून, बीएमसीसी कॉलेजमध्ये त्यांनी १९८९ मध्ये बी.कॉम.ची पदवी संपादन केली. त्यानंतर १९९२ मध्ये इंडियन लॉ सोसायटी (आयएलएस) विधी महाविद्यालयातून त्यांनी एलएल.बी. ही पदवी आणि त्यानंतर पुणे विद्यापीठामध्ये १९९५-१९९७ दरम्यान एलएल.एम.चे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. झाशीच्या बुंदेलखंड विद्यापीठातून त्यांनी 'दत्तक घेण्याच्या सामान्य कायद्याकडे' या विषयावर पीएच.डी. मिळविली. त्यांचे पती कर्नल केदार गोखले हे लष्करी क्षेत्रात कार्यरत असून, त्यांची प्रीती, प्रिया आणि ईशान ही तीन मुले विधीचे शिक्षण घेत आहेत. नीला गोखले यांनी अनेक वर्षे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दत्तक घेण्याच्या क्षेत्रात काम केले आहे. तसेच कुसुमबाई मोतीचंद महिला सेवा ग्राम, सारख्या संस्थांना नि:शुल्क सेवा दिल्या आहेत.

गोखले यांनी सात वर्षे कौटुंबिक न्यायालये व इतर प्राधिकरणांसह पुणे जिल्हा न्यायालयांमध्ये प्रॅक्टिस केली आहे. २००७ पासून त्या नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत. सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयांसमोर दिवाणी, फौजदारी आणि घटनात्मक स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये त्यांनी सक्रिय भाग घेतला आहे. वैयक्तिक सशस्त्र दलांसाठी मतदानाच्या अधिकारासाठी प्रभावी यंत्रणा शोधणे, भिन्न लिंग-पक्षपाती तरतुदींना आव्हान देणे, विशेषाधिकारांचे कोडिफिकेशन अशा प्रकरणांमध्ये इच्छुकांच्या नावे त्यांनी अनेक जनहित याचिका दाखल केल्या आहेत. सध्या गोखले नवी दिल्ली येथील आयएलआय विद्यापीठातील व्हिजिटिंग फॅकल्टीच्या सदस्य आहेत.

Web Title: Proud! Pune's Dr. Neela Kedar Gokhale will be a judge in the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.