कोरेगाव भीमा : सध्या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या व कर्जमाफीचा विषय तापला आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मनरेगा, शिक्षण, आरोग्य व लग्नविवाहांमध्ये बदल करणे गरजेचे आहे. याबाबत क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर निवेदनच सादर केले आहे.याबाबत पाचंगे यांनी सांगितले की, शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या पत्नीसह त्याच्याच शेतात काम करण्यासाठी महिन्यातील २० दिवस मनरेगा-रोजगार हमी योजनेंतर्गत शासनाने पगार देणे गरजेचे आहे. यामुळे त्या कुटुंबाला महिन्याला १० ते १२ हजार रुपये हमखास उत्पन्न मिळणार आहे. त्यांच्या मुलांचा पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च शासनाने करावा, असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. शेतकऱ्याला पिवळे रेशनिंग कार्ड देण्यात यावे. कुठलेही कर्ज दिल्यानंतर त्याच्या सातबाऱ्यावर बोजा चढवू नये, शेतीच्या कर्जासाठी त्या शेतीचे मूल्यमापन बिगरशेती (एनए) प्रमाणे ठरविण्यात यावे, शेतजमिनीला उद्योगाचा दर्जा देण्यात यावा, प्रत्येक तालुक्यात गोडावून व शीतगृहे उभी करावी व ती शेतकऱ्यांना नाममात्र भाड्याने वापरण्यास द्यावी, असे पर्यायही पाचंगे यांनी निवेदनात दिले आहेत. खासगी सावकारांची मान्यता काढून घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (वार्ताहर)
20 दिवस रोजगार द्या
By admin | Published: March 25, 2017 3:25 AM