लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढला असला, तरी त्याचे रेखाचित्र महत्त्वाचे ठरत आहे. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना रेखाचित्र काढण्याचे कसब मिळावे, या हेतूने राज्य गुन्हे अन्वेषण विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आयोजित प्रशिक्षण वर्गाची पहिली बॅच नुकतीच बाहेर पडली आहे.
पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी अशा १८ जणांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद कुलकर्णी, विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, उपमहानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, पाेलीस अधीक्षक संभाजी कदम, प्रा. अविनाश कुंभार, प्रा. सुरेश गोसावी, पोलीस उपअधीक्षक अनुजा देशमाने आदी उपस्थित होते.
तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल यांच्या सूचनेनुसार सीआयडीमध्ये रेखाचित्र कक्षाची स्थापना करण्यात आली. १ फेब्रुवारी ते २२ एप्रिल दरम्यान प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
पोलिसांना गुन्हेगारांचे रेखाचित्र काढण्यासाठी भारती विद्याापीठातील प्राध्यापक डॉ. गिरीश चरवड यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रशिक्षण कालावधीत सहभागी झालेल्या पोलिसांची चाचणी परीक्षाही घेण्यात आली होती. रेखाचित्र तज्ज्ञ चित्रकार समीर धर्माधिकारी, नुपूर मोहनकर यांनी मूल्यमापन केले. गुन्हा करून पसार झालेले संशयित आरोपी तसेच सीसीटीव्ही चित्रीकरण अस्पष्ट असल्यास संशयितांचे रेखाचित्र काढण्याचे प्रशिक्षण पोलिसांना या वर्गाच्या माध्यमातून देण्यात आले.