पुणे : कोरोना चाचणी करण्याकरिता येणाऱ्या नागरिकांकडून संबंधितांची तपशीलवार माहिती घेऊन ती आरोग्य विभागाला देण्यात यावी. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी आवश्यक असलेला संबंधितांचा पूर्ण पत्ता, मोबाईल अथवा दूरध्वनी क्रमांक याची इत्थंभूत माहिती देण्याच्या सक्त सूचना आरोग्य विभागाने खासगी लॅबला केल्या आहेत. त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या कामात सुसूत्रता येण्यास मदत मिळणार आहे.
आरोग्य विभागप्रमुख डॉ. आशिष भारती यांनी याबाबत माहिती दिली. पालिकेच्या आरोग्य विभागासह खासगी प्रयोगशाळांची बैठक नुकतीच घेण्यात आली. सहायक आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत यांच्यासह सर्व सहायक आरोग्य अधिकारी, परिमंडळ वैद्यकीय अधिकारी, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमधील अधिकारी यांनी शहरातील प्रयोगशाळांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. या बैठकीला उपस्थित न राहिलेल्या तीन प्रयोगशाळांकडून खुलासा मागवण्यात आला आहे.
प्रयोगशाळांनी संबंधित रुग्णांची नोंद ठेवण्यासोबतच रुग्ण आढळल्यास यंत्रणेला सूचित करणे, शहराच्या सीमा भागावर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. कंपन्यांकडून चाचण्या करताना प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पत्त्याची नोंद न कंपनीच्याच पत्त्यावर न करता त्यांच्या घरचा पत्ता, संपर्क क्रमांक नोंदवून घ्यावा. पुण्यात नातेवाईकांकडे आलेले पाहुणे बाधित झाल्यास ते मूळ गावी परत जातात. यामुळे अशा व्यक्तींची माहिती ठेवल्यास संबंधित प्रशासनाला कळवण्यास मदत होईल, असे डॉ. भारती म्हणाले.