निवेदनात म्हटले आहे की, समाजातील तुटपुंजे नोकरदार सोडले तर संपूर्ण नाभीक समाज हा व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे शासनाच्या निर्बंधामुळे दुकाने बंद ठेवावी लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील नाभिक समाज उघड्यावर आला आहे. त्यांना कुटुंबाची गुजराण कशी करावी या चिंतेत पडला आहे. तर या बंदमुळे घरभाडे, वीजबिल, किराणा कसा भरावा यामुळे पुरता अडचणीत सापडला आहे. तसेच उत्पन्नाचे इतर कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने आणि कोरोनामुळे ग्राहकांनीही सलून दुकानाकडे पाठ फिरवल्यामुळे गेले वर्षभर व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. गाळा भाडे, लाईटबिल, घरपट्टी, पाणीपट्टी, कर्ज हप्ते, रोजचा खर्च यामुळे संपूर्ण समाज अडचणीत आला आहे.
मागील लॉकडाऊनच्या काळात आर्थिक समस्यांना कंटाळून काही सलून व्यावसायिकांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपविले आहे. त्यांच्या कुटुंबानाही आर्थिक मदत मिळाली नसून त्यांनाही आर्थिक मदत मिळावी.
अजूनही आत्महत्या होत आहे. सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी करूनही अद्याप दखल घेण्यात आली नाही. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने पुन्हा एकदा राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. यामुळे सलून व ब्युटी पार्लर व्यवसाय ठप्प झाला आहे.
आमचा उदरनिर्वाहाचा पुन्हा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने या निर्बंधातून सलून व ब्युटी पार्लर व्यवसायाला सूट देण्यात यावी किंवा आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार, बारामतीचे प्रांतधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे बारामती तालुका नाभिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
.............................................