पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेने पीएमपीला गेल्या काही वर्षांत हजारो कोटींचा निधी व संचलन तुटीचे १३२ कोटी रुपये दिले आहेत़; परंतु त्यातून बससेवेत सुधार व प्रवासी संख्येत वाढ न होता,घसरणच सुरु आहे़ बस सेवासुधार व प्रवासी संख्येत वाढ होईल, या अटीवरच पीएमपीला निधी द्यावा, अशी मागणी पीएमपी प्रवासी मंचाने केली आहे़आजवर दिलेला निधी हा प्रामुख्याने ठेकेदार, पीएमपी अधिकारी, सेवक यांनाच वाटप करण्यात आला़ महापालिकेने पुन्हा नुकतेच ९० कोटी रुपये दिले आहेत़ ही गोष्ट चांगली आहे़ हा सर्व निधी बससेवा सुधार व सातत्याने बस प्रवासीवाढीसाठी असू शकतो़; परंतु निधी फक्त राजकीय हेतूने व संबंधितांच्या ‘बंद आंदोलन’ या दबावतंत्रामुळे कुठल्याही अटी न घालता दिला गेला आहे़ इतका मोठा निधी देऊनही सेवा व प्रवासी संख्या सुधारण्याऐवजी त्यात घसरण होत आहे़ सादरीकरणातून मिळविलेला स्मार्ट सिटी निवडीचा दर्जा बकाल सिटीकडे वाटचाल करायची नसेल, तर सातत्याने बसप्रवासी वाढीशिवाय पर्याय नसल्याचे जुगल राठी यांनी सांगितले़पीएमपीच्या ताफ्यात २०१० मध्ये १५८६ बसगाड्या होत्या़ त्यांचा वापर हा ७६ टक्के होतो़ त्यातून ११़५९ लाख दैनिक प्रवासी प्रवास करीत होते़ २०१५ मध्ये बसचा ताफा २०९४ पर्यंत पोहोचला; पण या ताफ्याचा वापर ६३ टक्क्यांवर येऊन दैनिक प्रवाशांची संख्या १०़८५ लाखांपर्यंत खाली आली आहे़ बससेवेत ही घसरण चालू आहे़ बंद पडणाऱ्या, नादुरुस्त बसगाड्या, बसची दुरवस्था, अस्वच्छ बस, अपघात, सेवक वर्तन, वेळापत्रकाचा व वक्तशीरपणाचा अभाव, बसस्थानक, थांबा दुरवस्था, स्वच्छतागृह, पाणी, सुरक्षिता अशा अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागते़ इंधनाचे दर कमी झाले असतानाही बसभाड्यात नियमित वाढ होत आहे़
सेवा सुधारली, तरच निधी द्या
By admin | Published: February 19, 2016 1:36 AM