कुरकुंभ : येथील औद्योगिक क्षेत्रामधील कामगारांच्या आरोग्याच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेऊन रोटरी क्लब आॅफ कुरकुंभ एमआयडीसीने जे आरोग्य केंद्र सुरू केले आहे, तो उपक्रम येणाऱ्या काळात परिसरातील कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असा उपक्रम आहे. त्यामुळे येथील कामगारांना त्याचा उपयोग अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत रोटरीच्या माध्यमातून उभारलेल्या आरोग्य केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक प्रकल्पामुळे कामगारांच्या आरोग्याच्या समस्या वारंवार निर्माण होत असतात. मात्र ही समस्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. मात्र या सर्व बाबींचा विचार करता एमआयडीसीमधील रोटरीच्या माध्यमातून केलेला हा उपक्रम येथे व्यवस्थापनाचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय ठरणार आहे, असेही कुल म्हणाले. रोटरी क्लबचे प्रांतपाल प्रशांत देशमुख, अधिकारी कुबेर जगदाळे, महेश भागवत, विनायक काळे, मुनीराजा रेड्डी, रवी नांगीया, बाप्पा बंडोपाध्याय, विकास टोपले, विजयानंद पेठकर, दीपक कल्याणी, माधवी वझे, अर्चना टोपले तसेच विविध कंपन्यांचे व्यवस्थापकीय अधिकारी उपस्थित होते. रोटरी क्लबच्या माध्यमातून प्रथमच अशा प्रकारच्या वैद्यकीय सेवा देणाऱ्या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे परिसरातील कामगारांना मोफत वैद्यकीय सेवा मिळणार आहे.या उपक्रमासाठी सर्वच स्तरांतून सकारात्मक सहकार्य मिळाले असल्याचे मत विनायक काळे यांनी व्यक्त केले, तर या पुढील काळातदेखील यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करून अतिदक्षता विभागदेखील निर्माण करण्याचा प्रयत्न असून, कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक प्रकल्पात रासायनिक प्रक्रियादरम्यान छोट्या स्वरूपातील अपघाताच्या घटना घडत असतात. (वार्ताहर)सेवेचा लाभ सर्वांनाचआरोग्यसेवेचा लाभ कुरकुंभ येथील औद्योगिक क्षेत्रामधील कामगार, त्यांचे कुटुंब तसेच महामार्गावर घडणाऱ्या अपघाताच्या घटना यामधील रुग्णांनादेखील मिळणार आहे. औद्योगिक क्षेत्रामधील अपघाता वेळी निर्माण होणाऱ्या वैद्यकीय सेवा यासाठी काम करणारे वैद्यकीय अधिकारी येथे असून, परिणामी या परिसरातील आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त सेवा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे अधिकारी डॉ. नेहा कुलकर्णी यांनी सांगितले.
कामगारांना आरोग्याच्या सोयी द्याव्यात
By admin | Published: October 21, 2016 4:45 AM