कोरेगाव भीमा (जि. पुणे) - १ जानेवारीच्या दंगलीमध्ये ग्रामस्थांचे २५ कोटी रुपयांहून अधिकचे नुकसान झाले आहे. तरीही प्रसारमाध्यमांत गावाचेच नाव बदनाम होत असल्याबाबत नाराजी व्यक्त करून शासनाने नुकसानग्रस्तांना तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.स्थानिक महिलांनी सांगितले, स्थानिकांनी जाळपोळ केल्याचे वृत्तवाहिन्यांवर सांगत आहेत. हे साफ चुकीचे आहे. आम्ही आमच्याच मालमत्तेचे नुकसान कसे करू शकतो? आम्ही आमचीच घरे, दुकाने जाळू शकतो का?१ जानेवारीला गाव बंद असल्याबाबत ग्रामस्थ म्हणाले, वढू येथील समाधीवरून झालेल्या वादाचे पडसाद गावात उमटू नयेत यासाठी ग्रामस्थांनी दुकाने बंद ठेवली होती. गावातील वैजयंता संजय मुथा या महिलेच्या उपजीविकेचे साधन असलेले दुकान दंगलखोरांनी जाळून टाकले. त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.पुन्हा जमावबंदीकोरेगाव भीमा : शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा, सणसवाडी येथील दंगलीत स्थानिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अद्यापही लोक एकत्र जमा होऊन दंगल निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी कोरेगाव भीमा, वढू बुद्रूक, सणसवाडी, शिक्रापूर व कोंढापुरी या गावांमध्ये ५ ते १० जानेवारी या काळात रात्री १२ वाजेपर्यंत पुन्हा जमावबंदी आदेश लागू केल्याचे प्रांताधिकारी भाऊ गलांडे यांनी सांगितले.विद्यार्थ्यांची शांतता रॅलीदंगलीच्या पार्श्वभूमीवर श्री छत्रपती संभाजी हायस्कूल व फ्रेंड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शांतता रॅली काढून सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश दिला. ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी दोन्ही समाजांमधील ग्र्रामस्थांच्या बैठका घेतल्या.बाहेरच्या शक्तींना थारा देऊ नका - गिरीश बापटदिवंगत राहुल फटांगडे कुटुंबास शासनस्तरावर शक्य ती मदत केली जाईल. नुकसानग्रस्तांचे पंचनामेही वस्तुस्थितीला धरून करण्याचा आदेश प्रशासनाला दिल्याचे सांगत कोणावरही अन्याय होणार नाही, बाहेरच्या शक्तींना थारा देऊ नका, असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. शुक्रवारी बापट यांनी कोरेगाव भीमा, सणसवाडी येथील नुकसानग्रस्तांची पाहणी केली. या वेळी त्यांच्यासमवेत आमदार बाबूराव पाचर्णे उपस्थित होते.
नुकसानग्रस्तांना तत्काळ भरपाई द्या, ग्रामस्थांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 3:53 AM