रिक्षाचालक ,पथारी व्यावसायिक यांच्यासह सर्व लाभार्थ्यांना तातडीने शासकीय मदत द्या: गिरीश बापट यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 05:36 PM2021-05-01T17:36:27+5:302021-05-01T17:38:43+5:30
रिक्षा चालक, पथारी व्यावसायिक यांचा व्यवसाय गेल्या कित्येक दिवसापासून बंद आहे. त्यामुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब अडचणीत आले आहे.
पुणे: कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेला १५ दिवसांचा लॉकडाऊन पूर्ण झाला असून पुन्हा एकदा राज्य सरकारने १५ मे पर्यंत दुसऱ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामुळे निश्चितच सर्वसामान्य नागरिक ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्या समोरच्या अडचणी वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर रिक्षाचालक, पथारी व्यावसायिक किंवा बऱ्याच संख्येने असलेल्या घरेलू कामगारांच्या बँक खात्यात जाहीर करण्यात आलेली शासकीय मदत तातडीने जमा करण्यात यावी अशी मागणी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी केली आहे.
पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर बापट यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
बापट म्हणाले,कोरोना काळात केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना मोफत अन्नधान्य पुरवलं. तसेच राज्य सरकारने देखील लॉकडाऊन जाहीर करताना ज्या काही पॅकेजची घोषणा केली आहे. त्याची त्वरित अंमलबजावणी झाली पाहिजे. तसेच जे काही रिक्षाचालक, पथारी व्यावसायिक व घरेलू कामगार आहेत त्यांच्या खात्यात तातडीने शासकीय आर्थिक मदत जमा करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था तयार असून प्रशासकीय यंत्रणेने तत्परतेने ही मदत पोहचवायला हवी.
रिक्षा चालक, पथारी व्यावसायिक यांचा व्यवसाय गेल्या कित्येक दिवसापासून बंद आहे. मात्र आता जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्यासह जे जे संबंधित अधिकारी आहे त्यांनी लाभार्थ्यांना ही शासकीय मदत लवकरात लवकर मिळेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी राजकीय पक्ष, सामाजिक संस्था यांची मदतीसाठी भेट घेत पुढील चार दिवसात लाभार्थ्यांना ही आर्थिक मदत देण्यास सुरुवात करावी.
लसीकरणातील गोंधळ दूर करण्यासाठी नियोजन गरजेचे...
पुण्याची लोकसंख्या पाहता एकाच दिवसात सर्वांना लस देणे शक्य नाही. मात्र लसीकरणाची मोहीम राबविताना प्रशासकीय पातळींवर लसींचा पुरवठा व साठा यांचा अंदाज घेत नियोजन करणे आवश्यक आहे. यामुळे नागरिकांना व्यवस्थित लस उपलब्ध होईल व केंद्रावरची विनाकारण होणारी प्रचंड गर्दी रोखता येईल असेही खासदार गिरीश बापट यांनी यावेळी सांगितले.
'सिरम'च्या आदर पुनावाला यांची भेट घेणार......
कोरोना काळात राज्य सरकार, आरोग्य विभाग, किंवा प्रशासकीय यंत्रणेला आम्ही सहकार्यच करत आहोत. मात्र अजित पवारांनी सांगितल्याप्रमाणे लसींच्या पुरवठ्यासाठी सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला यांची महापौर, पदाधिकारी यांच्या समवेत भेट घेणार आहे. यावेळी पुनावाला यांना पुण्यासाठी जास्तीत जास्त पुरवठा करण्यातबाबत विनंती करणार आहे.