पुणे - जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागातील परिस्थितीचा अभ्यास करून ज्या गावांना पाण्याची टंचाई आहे; त्यांना त्वरित पाणीपुरवठा करण्यात यावा. तसेच टंचाई दूर करण्यासाठी गेल्या वर्षातील आणि या वर्षी आलेले सर्व प्रस्ताव मंजूर करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी शुक्रवारी बोलावलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. याबरोबरच तालुकास्तरावरील सर्व अधिकाºयांना निमंत्रित करून पाणीटंचाईचा अभ्यास करताना सर्व अधिकाºयांनी प्रत्यक्ष पाहणी करून तालुकानिहाय माहिती घ्यावी, अशा सूचनाही देवकाते यांनी दिल्या. जिल्ह्यात पाणीटंचाई करण्यासाठी नव्या विंधन विहिरी, जलयुक्त शिवार योजना, पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेअंतर्गत अनेक योजना राबविण्यात आल्या. यामुळे भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यास या वर्षी मोठी मदत झाली. गेल्या वर्षी मे महिन्यात २७ गावे आणि २८० वाड्यावस्त्यांवरील ७६ हजार ८५२ नागरिकांना ३४ टँकरच्या साह्याने पाणी पुरविले जात होते. मात्र, टंचाईच्या झालेल्या कामांमुळे या वर्षी ३ गावे ८ वाड्यांसाठी २ टँकर सुरू झाले आहेत. येत्या काळात जिल्हा टंचाईमुक्त करण्याच्या हेतूने मोठ्या प्रमाणात टंचाईची कामे हाती घेण्यात येणार आहे. याद्वारे जलयुक्त शिवारसारख्या मोहिमांना बळकटी देण्यात येणार असल्याचे देवकाते यांनी सांगितले. जिल्ह्यातील गावे आणि वाड्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी करण्यात येणाºया उपाययोजनांसाठी जिल्हाधिकारी यांनी ३३५३३.०६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यानुसार ३६७ नवीन विंधनविहिरी घेण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत त्यातील २५९ विहिरींच्या खोदाईला सुरुवात करण्यात आली आहे. याबरोबरच ३७९ विंधनविहिरींच्या विशेष दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यातील २३८ कामे पूर्ण झाली आहेत. सध्या तीन विहीर अधिग्रहित करण्यात आले आहे. नळपाणीपुरवठा योजना दुरुस्तीअंतर्गत ११४ कामांना मजुरी मिळाली असून, त्यासाठी १३८९ लाखांचा निधी देण्यात आला आहे. तात्पुरती पूरक योजनेअंतर्गत २१ कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी २२३.०७ लाख एवढा निधी मिळाला आहे. विहीर खोलीकर तसेच गाळ काढण्याची ६४ कामे मंजूर करण्यात आली आहेत. ही सर्व कामे येत्या १५ मेपर्यंत पूर्ण होतील, असे आश्वासन अधिकाºयांनी दिले. जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील सोनोरी गावासाठी १ टँकर सुरू आहे आणि भोर तालुक्यातील भुतोंडे म्हसर बु. साठी २ टँकर सुरू आहेत. आंबेगाव येथे ५, हवेली येथे २ तसेच भोर, दौंड आणि वेल्हा येथे प्रत्येकी दोन असे एकूण १६ टँकर सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे आले आहेत. पाणीटंचाई दूर करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील उपाययोजना केल्या जात आहे. त्या सर्व कामांचा वेग वाढवावा, टंचाईमध्ये जी गावे आहेत तेथील कामे करताना ती चांगल्या पद्धतीने करण्यावर प्राधान्याने भर देण्यात येणार आहे. त्याबाबत पाइपखरेदी ही जिल्हा परिषदेकडून करण्यात येणार आहे. भविष्यात जिल्हा पाणीटंचाईमुक्त होण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. - विश्वास देवकाते, अध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे
टंचाईग्रस्त भागांना त्वरित पाणीपुरवठा करा - विश्वास देवकाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 3:38 AM