पुणे : सोशल मीडियावर नोकरीसाठी अर्ज केला असता एयरपोर्टवर नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून एका वृद्धाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विश्रांतवाडी परिसरात राहणाऱ्या एका ६० वर्षीय वृद्धाने फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटल्यानुसार हा प्रकार एप्रिल २०२३ ते जून २०२० यादरम्यान घडला. फिर्यादी यांनी सोशल मीडियावरून नोकरीसाठी अर्ज केला. अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन करून एयरपोर्टवर सिक्युरिटी गार्ड किंवा ऍडमिन मध्ये नोकरीसाठी जागा उपलब्ध आहे असे सांगितले. त्यानंतर त्यांचा ऑनलाईन पद्धतीने मुलाखत घेऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर रजिस्ट्रेशन फी, डॉक्युमेंटेशन फी, आयडी कार्ड बनवण्यासाठी फी अशी वेगवेगळी कारणे सांगून एकूण २ लाख ९८ हजार ७०० रुपये उकळण्यात आले. पैसे भरुनसुद्धा नोकरी मिळाली नाही याबाबत विचारणा केली असता कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादींच्या लक्षात आले. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे पुढील तपास करत आहेत.