लोकमत न्यूज नेटवर्कजेजुरी : पुणे-कोल्हापूर लोहमार्गावरील महत्त्वपूर्ण असलेल्या जेजुरी रेल्वेस्थानकामध्ये अनेक सोई-सुविधांचा अभाव आहे. पुढील काही दिवसांमध्ये रेल्वेस्थानकाच्या विकासकामांना सुरुवात करण्यात येईल. त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहेच. त्याचप्रमाणे खासदार फंडातूनसुद्धा भरीव निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.तीर्थक्षेत्राचे आणि औद्योगिक वसाहतीचे ठिकाण असलेल्या जेजुरी रेल्वेस्थानकामध्ये अनेक सोई-सुविधांचा अभाव आहे. ब्रिटिशकालीन रेल्वेस्थानकामध्ये स्वच्छतागृह-स्नानगृहाचा अभाव आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची कमी असल्याने गाडीमध्ये चढताना व उतरताना प्रवाशांचा तोल जाऊन अनेक वेळा अपघात होऊन जबर जखमी होण्याच्या व अनेक प्रवाशांचा मृत्यू होण्याच्या घटना घडल्या आहेत. रात्रीच्या वेळी रखवालदाराची वानवा आहे. त्यामुळे प्रवाशांना विशेषत: महिलांना असुरक्षित वाटते. स्थानकामध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रेल्वेस्थानकाचे शेडला गळती लागते. लांबपल्ल्याच्या सुपरफास्ट गाड्यांचा थांबा नाही, अशा अनेक असुविधा येथल्या स्थानकामध्ये आहेत. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून रेल्वेस्थानक परिसरातील रहिवासी माजी नगरसेवक मेहबूब पानसरे व त्यांचे सहकारी रेल्वे प्रशासनाकडे सोई-सुविधा निर्माण कराव्यात, यासाठी पाठपुरावा करीत आहेत. त्याअनुषंगाने सुप्रिया सुळे यांनी मागील महिन्यांत जेजुरी रेल्वेस्थानकाला भेट देऊन पाहणी करीत रहिवासी व प्रवाशांबरोबर संवाद साधला होता. त्या वेळी पुणे येथील रेल्वेच्या वरिष्ठ कार्यालयामध्ये याबाबत बैठक घेण्यात येईल, असे सुळे यांनी आश्वासन दिले होते. गुरुवारी (दि. १३) रेल्वे प्रशासनाच्या पुणे येथे विभागीय कार्यालयामध्ये बैठक पार पडली. या वेळी खासदार सुळे यांच्यासह बारामती लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक प्रवीण शिंदे, रेल्वे प्रशासनाचे पुणे विभागाचे महाव्यवस्थापक बी. के. दादाभॉय, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णात पाटील, पुणे विभागीय वरिष्ठ वाहतूक व्यवस्थापक गौरव झा, सहायक निरीक्षक सुरेश जैन, जेजुरी नगरपालिकेचे नगरसेवक जयदीप बारभाई, माजी नगरसेवक मेहबूब पानसरे, जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिगंबर दुर्गाडे, पुरंदर तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष शिवाजी पोमण उपस्थित होते. पुणे ते लोणंद अशी शटलसेवा सुरू करावी, त्याहून महत्त्वाचे म्हणजे जेजुरी रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण करून ते मॉडेल स्टेशन करावयाचा प्रयत्न व्हावा आदी विकासकामांबाबत बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. खासदार सुळे यांनी या कामांसाठी खासदार निधीतून भरीव तरतूद करून देण्याचे आश्वासन दिले. पुढील आठवड्यामध्ये रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व खासदार सुळे यांचे संयुक्तिक शिष्टमंडळ जेजुरी रेल्वेस्थानकाला भेट देणार आहे. या वेळी रेल्वेस्थानकातील विविध विकासकामांचा आढावा घेऊन आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांनी सांगितले.
जेजुरी रेल्वेस्थानकातील सुविधांसाठी निधी देणार
By admin | Published: July 16, 2017 3:44 AM