पुणे : राज्य सरकारकडून महापालिकेच्या नागरवस्ती दलित वस्ती सुधारणा योजनेसाठी ३ कोटी ५० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील २४ दलित वसाहतींमध्ये या तरतुदीचे समान वाटप होईल. रस्ते, पाणी, यासारख्या मुलभूत सुविधा त्यातून दिल्या जाणार आहेत. त्यासाठीचे प्रस्ताव महापालिकेकडून पाठवण्यात येणार आहे. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी ही माहिती दिली.
राज्य सरकारच्या मागासवर्गीय कल्याण निधी योजनेत स्थानिक स्वराज्य संस्थांना दरवर्षी निधी दिला जातो. पुणे महापालिकेला मागील वर्षी १ कोटी रूपये मिळाले त्यातील फक्त ३४ लाख रूपये खर्च करण्यात आले. त्याचा आढावा घेण्यासाठी डॉ. धेंडे यांनी महापालिकेत बैठक घेतली. पैसे खर्च होत नसल्याबद्धल त्यांनी नाराजी व्यक्त केली. १३ नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते.बैठक सुरू असतानाच डॉ. धेंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील या विभागाकडे चौकशी केली असता त्यांना यावर्षांसाठी ३ कोटी ५० लाख रूपये मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. त्यासाठीचे प्रस्ताव पाठवण्याचे आदेश डॉ. धेंडे यांनी महापालिका अधिकार्यांना दिले. शिवाजीनगर भागांत मुलांसाठी वस्तीगृह उभारण्यासाठी सुमारे २० गुंठे जमीन शोधण्यात येत आहे. भूमि जिंदगी विभागाचा अधिकार्यांशी त्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. मागील वेळी फक्त कसबा पेठेतील वसाहतींसाठीच तब्बल ११ प्रस्ताव पाठवण्यात आले. यावेळी तसे करू नये, शहरातील सर्व म्हणजे २४ दलित वसाहतींमध्ये समान खर्च व्हावा असे डॉ. धेंडे यांनी अधिकार्यांना सांगितले.