पुणे: भावी पिढ्यांना शिवरायांच्या स्फुर्तीदायी चरित्राची ओळख अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे करुन देण्यासाठी पुणे शहरातील आंबेगाव येथे चार टप्प्यात भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यातील दोन टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम अधिक गतीने होण्यासाठी राज्य शासनाकडून ५० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे शिवसृष्टीच्या पुढील दोन टप्प्यांचे काम वेगाने होण्याचा मार्ग मोकळा झाला.
महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आणि पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मूळ संकल्पनेतून शिवसृष्टी साकारली जात आहे. शिवसृष्टी पुढील पिढ्यांसाठी प्रेरणेचे एक केंद्र ठरणार असून, यातील पुढील टप्पे लवकरात लवकर पूर्ण व्हावे या दृष्टीने शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्याच्या उभारणीसाठी राज्य सरकारतर्फे ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे.
शिवसृष्टीला राज्य सरकारने महत्त्वाच्या पर्यटन स्थळाचा दर्जा दिला असला तरी शिवसृष्टी हे निव्वळ एक पर्यटन केंद्र नसून, छत्रपती शिवरायांवरील अभ्यासाचे आणि त्यांच्या व्यक्तीमत्त्वापासून प्रेरणा घेण्याचे केंद्र बनले आहे. शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याच्या निर्मितीमध्ये सुमारे रुपये ८७ कोटी इतकी गुंतवणूक करण्यात आली असून स्वदेश, स्वधर्म व स्वभाषा ही शिवाजी महाराजांना जवळची असणारी महत्वाची ३ तत्वे यावर या टप्प्याच्या निर्मितीमध्ये विशेष लक्ष केंद्रित केले आहे.