पुणे : आंबिल ओढा येथील साने गुरुजी पालिका कर्मचारी वसाहतीमधील इमारती अत्यंत धोकादायक बनलेल्या आहेत. या इमारतींच्या पुनर्विकासासाठी स्थायी समितीने सहा कोटी २० लाख रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे.
पालिकेच्या कर्मचारी वसाहतींची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. यातील काही इमारती तर केव्हाही पडतील असे अहवालच प्रशासनाकडे प्राप्त झालेले आहेत. यातीलच एक असलेल्या साने गुरुजी वसाहतीच्या पुनर्विकासाचा निर्णय अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. येथील रहिवाशांनी घरे आमच्या नावावर करावीत अशी मागणी केलेली आहे. पालिकेच्या २६ कर्मचारी वसाहती ५० वर्षांपुर्वी बांधलेल्या आहेत. यातील ११ वसाहती साने गुरुजी नगरात आहेत. सहा बैठ्या वसाहती आहेत.
वसाहतींच्या विकासाचे बीओटी तत्वावर दिलेले काम ठेकेदाराने दहा ते बारा वर्षे प्रलंबित ठेवल्याने ही प्रक्रियाच प्रशासनाने रद्द केली आहे. पुर्नविकासासाठी पालिकेच्या अंदाजपत्रकात २ कोटी ४० लाखांची करण्यात आलेली तरतूद अपुरी असल्यामुळे प्रशासनाने याकामासाठी वर्गीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीला दिला होता. योग केंद्र उभारणे ९५ लाख, हिराबाग येथे व्यापारी संकुल उभारणे १ कोटी, बेबी रुग्णालय ६४ लाख आणि विविध क्रीडा संकुलांसाठी असलेल्या ४० लाख रुपयांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.