धनकवडी : कुस्ती पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलाच्या विविध विकासकामांसाठी पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पालिकेच्या २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात तब्बल एक कोटी रुपयांची भरघोस तरतूद केली आहे. महापौरांनी केलेल्या तरतुदीमुळे कुस्तीप्रेमी, प्रशिक्षक, वस्ताद, सर्व आजी-माजी पैलवान, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालकवर्ग अशा विविध स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.
भारती विद्यापीठ परिसरात असणाऱ्या मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलाने महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रासाठी अनेक कुस्तीगीर घडवले आहेत. अखंड महाराष्ट्रसह संपूर्ण देशातून अनेक प्रशिक्षणार्थी पैलवान कुस्तीचे प्रशिक्षण घेण्यासाठी येथे येत असतात. त्यामुळे या संकुलात विविध सोयी-सुविधांची आवश्यकता आहे.
तसेच, पैलवानांना सरावासाठी खुले मैदान, जलतरण तलाव आणि बास्केटबॉल कोर्ट अशा विविध सोयीसुविधा देणे गरजेचे आहे. महापौर स्वतः पैलवान असल्याने कुस्ती क्षेत्रातील विविध अडचणींची त्यांना जाणीव आहे. त्यामुळेच कुस्ती केंद्रातील गरजा ओळखून महापौरांनी आर्थिक तरतूद केली आहे.
मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलाचे वस्ताद, ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली मांगडे म्हणाले की, "मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात पैलवानांच्या सरावासाठी खुले मैदान आणि क्षमता वाढवण्यासाठी जलतरण तलाव या सुविधा निर्माण झाल्यास २०२४ आणि २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये या कुस्ती संकुलाचे मल्ल भारताचे प्रतिनिधित्व करून पदके मिळवतील यात शंका नाही. तसेच या वेळी त्यांनी महापौरांचे आभार मानले.