पुणे : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सन २०२०-२१ च्या शेवटच्या बैठकीत शुक्रवारी सर्वपक्षीय नगरसेवकांना खूष करण्यात आले आहे़ यात आर्थिक तरतुदीचा प्रस्ताव सादर करणाऱ्या नगरसेवकांना प्रकल्पीय कामांसाठी २४६ कोटींची तरतूद वर्गीकरणातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
स्थायी समितीने ही आर्थिक तरतूद करताना पदाधिकारी अथवा सदस्य असा भेदभाव न करता, सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांसाठी २ कोटी रूपये तर विरोधी पक्षाच्या सदस्यांना १ कोटी रूपयांची तरतूद करून दिली असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने पत्रकार परिषदेत दिली़
स्थायी समितीने आज २४६ कोटी रुपयांचे वर्गीकरणाचे प्रस्ताव मंजूर केले असले तरी, ही कामे सदस्यांच्या पुढील वर्षीच्या अंदाजपत्रकातील निधीतून करण्यात येणार आहेत़ या आर्थिक वर्षात केवळ प्रकल्पीय कामांचे इस्टिमेट, निविदा प्रक्रिया आणि वर्क ऑर्डरसारख्या तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात येणार आहेत़ २०२०-२१ मध्ये कोरोनामुळे कोरोनामुळे आर्थिक गाडा थांबल्याने, विकास प्रकल्प रखडले गेले होते़ त्यामुळे आपल्या पाच वर्षाच्या काळात शेवटच्या वर्षात तरी रखडलेले विकास प्रकल्प पूर्ण करता यावेत, यासाठी ही आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे.
---------------------------------