बारामती : बारामतीच्या रेल्वे मार्गासाठी ७०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. भूसंपादनाचे काम मार्गी लागल्यानंतर येत्या तीन महिन्यांत बारामती - फलटण - लोणंद या नव्या रेल्वेमार्गाचे काम सुरू होणार आहे. रेल्वेचे मुख्य जंक्शन बारामतीपासून ७ किलोमीटरवर असलेल्या नेपत वळण येथे होणार आहे, अशी माहिती माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिली. बारामती नगरपालिकेच्या नवीन प्रशासकिय इमारतीचे शुक्रवारी उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते. ते म्हणाले, बारामती फलटण - लोणंद असा रेल्वे मार्ग फलटणच्या सीमेपर्यंत आला आहे. मात्र, बारामतीच्या बागायती भागातून पुढचा मार्ग होता. त्यामुळे या मार्गाला आपला स्वत:चा विरोध होता. त्यावर पर्यायी मार्ग रेल्वे मंत्रालयाला दिला. आता बारामतीच्या जिरायती भागातून मार्ग होणार आहे. पूर्वी या प्रकल्पाला १२७ कोटी रुपयांची तरतूद होती. त्यामध्ये रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी वाढ केली. आता हा प्रकल्प ७०० कोटी रुपयांवर जाणार आहे. शहरातील रेल्वे स्थानक कायम ठेवले जाणार असून कोऱ्हाळेजवळच्या कठीण पुलापासून ढाकाळे गावाच्या हद्दीतून नेपत वळणपर्यंत नवा रेल्वे मार्ग मंजूर करण्यात आला आहे. नेपत वळण येथे नवीन रेल्वे जंक्शन होणार आहे. त्याचबरोबर शहरातील स्टेशन कायम ठेवून कटफळ येथेही रेल्वे स्टेशन केले जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले. त्यामुळे बारामती - हैदराबाद आणि बारामती ते बंगलोर असे जोडले जाणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी, बारामती, दौंड नीरा या रेल्वेस्थानकांचा विकास होणार आहे. बारामती ते मुंबई थेट फास्ट ट्रेन येत्या काही दिवसांत सुरू होणार असल्याचे सांगितले.
बारामती रेल्वेमार्गासाठी ७०० कोटींची तरतूद
By admin | Published: November 14, 2015 3:02 AM