पुणे : अंदाजपत्रकात फक्त ७५ लाख रुपयांची तरतूद असताना नेहरू स्टेडियमच्या कामांसाठी थेट ८ कोटी रुपयांची निविदा काढल्यावरून महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. सदस्यांच्या माऱ्यापुढे हतबल होत अखेर प्रशासनाने यात काही गोष्टी चुकीच्या झाल्या असल्याची कबुली देत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी हा विषय उपस्थित केला. नेहरू स्टेडियमवर कोणतेही आंतरराष्ट्रीय सामने होत नाहीत. फक्त सरावासाठी तसेच साध्या सामन्यांसाठी हे मैदान दिवसा वापरले जाते. असे असताना त्यावर लाईट््स लावण्यासाठी ८ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली, त्यासाठी ठेकेदारांनी साखळी केल्याची माहिती असूनही त्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. असे का केले, कोणाच्या मंजुरीने केले, दिव्यांच्या निविदा काढण्याआधी कोणत्या तज्ज्ञांचा सल्ला घेतला अशा प्रश्नांची सरबत्तीच शिंदे यांनी प्रशासनावर केली. अतिरिक्त आयुक्तांनी काही शंका लेखी स्वरूपात उपस्थित केल्यानंतरही त्या डावलून निविदाप्रक्रिया राबविण्यात आली असा थेट आरोपच शिंदे यांनी केला व यासंबंधी खुलासा व्हावा अशी मागणी केली. ज्या रकमेची निविदा काढायची त्याच्या किमान निम्म्या रकमेची तरतूद अंदाजपत्रकात असावी या नियमाचे उल्लंघन करण्यात आल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.विद्युत शाखेचे प्रमुख अभियंता श्रीकृष्ण चौधरी यांनी त्यांना उत्तर दिले. मात्र कोणाची मंजुरी घेतली, कोणत्या तज्ज्ञांचा सल्ला घेतला याविषयी त्यांना काही सांगता आले नाही. मैदानावर आंतरराष्ट्रीय सामने होत नसले तरी तिथे सरावासाठी म्हणून सायंकाळी शिबिरे घेतली जातात असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र शिंदे यांनी नियमांचे उल्लंघन झाले आहे किंवा नाही ते स्पष्ट सांगा असा आग्रह धरला. अशोक येनपुरे, मनीषा घाटे, किशोर शिंदे यांनीही प्रशासनाने त्वरित खुलासा करावा, अशी मागणी केली. (प्रतिनिधी)
तरतूद ७५ लाख, निविदा ८ कोटींची
By admin | Published: October 14, 2016 5:06 AM