पुण्यात पुनश्च ‘लॉकडाऊन’, नको रे बाबा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:13 AM2021-03-09T04:13:30+5:302021-03-09T14:17:20+5:30
पुणे : कोरोनाचा पहिला रूग्ण पुण्यात सापडला आणि गतवर्षी मार्च ते ऑक्टोबर दरम्यान तब्बल दहा महिन्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांना ब्रेक ...
पुणे : कोरोनाचा पहिला रूग्ण पुण्यात सापडला आणि गतवर्षी मार्च ते ऑक्टोबर दरम्यान तब्बल दहा महिन्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांना ब्रेक लागला. कोरोनामुळे सांस्कृतिक आणि कला विश्व ठप्प झाले. अगदी नाटकांपासून ते चित्रपट-मालिकांचे ठप्प झालेले शुटींंग, ज्येष्ठ कलावंतांचे रखडलेले मानधन, ग्रंथालयांवरील निर्बंध, साहित्य संमेलने, संगीत महोत्सव, एकांकिका स्पर्धांच्या आयोजनावरचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आर्थिक अडचण आणि नैराश्येमुळे काही कलाकारांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला....आता नवीन वर्षात सांस्कृतिक क्षेत्राची घडी पुन्हा सुरळित झाली असताना कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. आता पुनश्च ‘लॉकडाऊन नको रे बाबा’....असे कलाकारांकडून सांगण्यात येत आहे.
----------------------------------------
ओटीटी प्लँटफॉर्मने मनोरंजन विश्व तारले
नाट्यगृह आणि चित्रपटगृह बंद असल्याने घरबसल्या मनोरंजनासाठी प्रेक्षक ओटीटी माध्यमाकडे वळले. नेटफ्लिक्स, अँमेझॉन प्राईम, वूट, हॉटस्टार आदी ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवे वेब सिरिज, चित्रपट आणि मालिका प्रदर्शित झाल्या आणि प्रेक्षकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला. ओटीटी प्लॅटफॉर्मने मनोरंजन क्षेत्राला नवे बळ दिले आहे.
----------------------
चित्रपटगृहे सुरु, पण प्रेक्षक नाही....
चित्रपटगृहे 50 टक्के क्षमतेने सुरु करण्यास 4 नोव्हेंवर 2020 रोजी राज्य सरकारने परवानगी दिली. काही दिवसानंतर पुण्यातील मोजकी चित्रपटगृहे सुरु झाली. पण, नवीन चित्रपट प्रदर्शित न झाल्याने आणि प्रेक्षकांचा चित्रपटगृहात चित्रपट बघण्याचा विचार नसल्यामुळे अजूनही चित्रपटगृहांना म्हणावा तसा प्रेक्षकांचा प्रतिसाद नाही. त्यात केंद्र सरकारने संपूर्ण क्षमतेने चित्रपटगृहे सुरु करण्यास परवानगी दिली असली तरी राज्य सरकारने कोरोनामुळे अजूनही त्याला परवानगी दिलेली नाही. त्यात आर्थिक अडचणीत असलेली एकपडदा चित्रपटगृहे अजूनही बंद आहेत.
---------------------
सांस्कृतिक कार्यक्रमांना ‘ब्रेक’
संगीत, नृत्य, मुलाखती, संवादसत्र, सांगीतिक मैफिली, आॅक्रेस्ट्रा कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम एकपात्री कार्यक्रम, चित्रपट महोत्सव, पुस्तक प्रकाशन...असे सारेकाही गतवर्षी बंद होते. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवही 2020 मध्ये होऊ शकला नाही. नवीन वर्षात सांस्कृतिक विश्वाचे ‘न्यू नॉर्मल’ सुरू झाले. पण कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे हे कार्यक्रम काही संस्थांनी पुढे ढकलले आहेत तर काही कार्यक्रम खबरदारी घेऊन घेतले जात आहेत.
------------------------
साहित्य संमेलन स्थगित
नाशिक येथे होणारे आगामी साहित्य संमेलन होईल की नाही ही चर्चा वर्षभर सुरु होती. पण, अखेर संमेलन होणार हे निश्चित झाले. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ आणि विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. परंतू, सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे संमेलन स्थगित करण्यात आले आहे.
-----------------------------------------
गदिमांच्या नियोजित स्मारकाचे भूमीपूजन स्थगित....
गीतरामायणाचे शिल्पकार ग. दि.माडगूळकर यांच्या नियोजित स्मारकासाठी मध्यतंरी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्मारकासाठीचे भूमिपूजन लवकरच करू, असे सांगितले. मात्र, फेब्रुवारी महिना उलटला तरी स्मारकाचे भूमिपूजन झाले नाही. कोरोनाच्या वाढत्या संसगार्मुळे छोटेखानी कार्यक्रम वर्षाच्या शेवटी स्मारकाच्या काम सुरु करण्यात येणार आहे.
------------
पुरूषोत्तम आणि फिरोदिया करंडकला तरूणाई मुकली
महाविद्यालये बंद असल्याने पुरुषोत्तम करंडक ते फिरोदिया करंडक अशा महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धां होतील की नाही याची चर्चा तरूणाईमध्ये होती..पण, कोरोनामुळे संयोजन संस्थांना एकांकिका स्पर्धा घेणे शक्य झाले नाही. नवे वर्ष सुरु होताना स्पर्धा होतील असे वाटले होते. पण, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे एकांकिका स्पर्धांच्या आयोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
--------